गेल्या सहा दिवसांमध्ये टोलनाक्यांवर टोलवसुली होत नसल्यामुळे वाहनांच्या रांगा लागलेल्या नाहीत. टोलसाठी थांबावं लागत नसल्यामुळे पर्यायाने वाहनचालकांच्या इंधनाचीही बचत होत आहे. सहा दिवसांमध्ये मुंबईतील वाहनचालकांचं जवळपास 1.8 कोटी रुपयांचं इंधन वाचल्याची माहिती आहे.
तूर्तास टोलबंदीला 18 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे याच हिशेबाने 18 तारखेपर्यंत म्हणजे एकूण दहा दिवसांत तब्बल तीन कोटी रुपयांचं इंधन वाचण्याची शक्यता आहे.
टोलनाक्यांवर काही काळ थांबल्यामुळे, रांगेत वाट पाहत राहिल्यामुळे आणि गाडी पुन्हा सुरु करण्यामुळे काही लिटर इंधन वाया जातं, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. प्रत्येक वाहन सरासरी आठ ते दहा मिनिटांचा वेळ टोलनाक्यावर घालवतं. सध्याच्या इंधन दरांचा विचार करता टोलनाक्यांवर प्रत्येक वाहनातून सरासरी 10 रुपयांचं इंधन वाया जातं.
दररोज मुंबई एन्ट्री पॉइंट्स, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, वांद्रे-वरळी सी लिंक यासारख्या मुंबईतल्या सात टोलनाक्यांवर 3 लाख वाहनं ये-जा करतात. प्रत्येक वाहनातून सरासरी 10 रुपयांचं इंधन वाया जात असल्यास, या हिशेबाने दररोज 30 लाख रुपयांच्या इंधनाची नासाडी होते. यानुसार दर वर्षाला मुंबईतील वाहनचालकांकडून 108 कोटींच्या इंधनाचा अनावश्यक धूर होतो.