Mumbai Water Storage : राज्यात तापमानाचा भडका उडालेला असताना आता पाणीटंचाईचा सावट ही मान उंचावून उभे आहे. राज्यातील अनेक लहान मोठ्या धरणांची परिस्थिती सध्या चिंताजनक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात जलसंकट (Maharashtra Dam) अधिक गडद होण्याची भीती वर्तवली जात असताना मुंबईकरांसाठी ही एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा अवघ्या 23 टक्क्यांवर येऊन पोहचला आहे. तीव्र उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील जलसाठा 23 टक्क्यांवर आला आहे. परिणामी मुंबईकरांवर आता पाणीकपातीची टांगती तलवार आहे. मात्र, पाणी कपातीचा विचार अद्याप तरी नसल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, येत्या 15 मेपर्यंत आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाने म्हटले आहे. मुंबईकरांना दररोज 3,950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यात वर्षभरासाठी सातही धरणांत मिळून 14, 47,363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. परंतु यंदा 4,11,355 दशलक्ष लिटर इतका साठा आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने राज्य सरकारकडे अतिरिक्त पाण्यासाठी मागणी केली आहे. सरकारने 2,30,500 दशलक्ष लिटर राखीव साठा देण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे. ज्यात भातसा आणि अप्पर वैतरणातून हा साठा घेण्यात येईल.
तीन वर्षांतील धरणस्थिती
वर्ष - पाणीसाठा (दक्षलक्ष लि.) - टक्के
2025- 333718- 23.06%2024- 258988- 17.89% 2023- 339259- 23.44 %
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहरातील काही भागात पाणी कपात
अशातच, पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आजपासून(5 मे) शहरातील काही भागात पाणी कपातीला सुरुवात होणार आहे. यात दक्षिण पुण्याला आजपासून रोटेशन पद्धतीने पाणी कपात होणार आहे. ज्यामध्ये पुण्यातील सिंहगड रस्ता भाग, सहकारनगर, धनकवडी, बालाजी नगर, आंबेगाव पठार, दत्तनगर, संतोषनगर, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक या भागाचा यात समावेश आहे. वाढत्या उष्णतेमुळे पुणे शहरातील उपनगरात पाण्याची मागणी वाढली असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. वडगांव जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाणी पुरवठा होणाऱ्या भागांत आजपासून रोटेशन पद्धतीने पाणी कपात होणार आहे.
नेमकं रोटेशन पद्धतीने पाणी कपातीचे कारण काय?
वडगाव जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता 250 एम.एल.डी. असून सद्यस्थितीत 243 एम.एल.डी. पाणीपुरवठा करण्यात येतो .या व्यतिरिक्त नवीन समाविष्ठ आंबेगाव बु. व खुर्द परिसरात 15 एम.एल.डी. पाणीपुरवठा होतो तसेच टँकर सुमारे 5 एम.एल.डी. व तळजाई वनक्षेत्रा मध्ये 5 एम.एल.डी. याप्रमाणे एकूण 25 एम.एल.डी. अतिरिक्त पाणीपुरवठा होतो.
त्यामुळे सुमारे 25 एम.एल.डी. पाणीपुरवठा कमतरता असल्याने या व्यतिरिक्त पाण्याचा विचार करिता वडगाव जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता अपूरी पडत आहे .उन्हाळा कालावधी मधील वाढती पाणीपुरवठा मागणीचे पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठा अपुरा असल्याने धायरी, सनसिटी, वडगावबु., हिंगणे, सहकारनगर, धनकवडी, बालाजीनगर, आंबेगावपठार, दत्त नगर, संतोषनगर, भारती विद्यापीठ परिसर, आगम मंदिर, कात्रज, कोंढवा बु. परिसरास विभागवार पध्दतीने ( सोबत जोडलेल्या तकत्या प्रमाणे ) झोन निहाय एक दिवस पाणीपुरवठा बंद करून पाणी वितरीत करण्यासाठी हा निर्णय महापालिकेने घेतला आहे.