Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार आजही (17 मे 2025) महाराष्ट्रतील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. अशातच आता मुंबईत देखील पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबई आणि उपनगराच्या काही भागात काळ्या ढगांनी एकच गर्दी केली असून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सकाळी घरातून बाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. मुंबईसह ठाणे, पालघरमधील काही भागांत शनिवारी हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली होती. अशातच आज शनिवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाल्याने असह्य उकाड्यातून काहीसा दिलासा मुंबईकरांन मिळला आहे. तर पुढील दोन-तीन दिवस मुंबईत संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुढील 3-4 तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

पुढे आलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील दादर, लोअर परेल, ताडदेव परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. तर पुढील 3-4 तासांत मुंबईच्या काही भागात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

पावसाचा लोकल ट्रेन्सला फटका

दरम्यान, या पावसाने मुंबईच्या पश्चिम उपनगरात देखील हजेरी लावली आहे. मागील 15 ते 20 मिनटं पासून पश्चिम उपनगरात पाऊस सुरू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव,  मालाड, कांदिवली, विलेपार्ले, सांताक्रुझ परिसरात सध्या पाऊस सुरू आहे. परिणामी या पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. मुंबई लोकलची वाहतूक सेवा काही भागात विस्कळीत झाली असून लोकल ट्रेन्स 10 ते 15 मिनिटं उशीराने धावत आहेत. 

हवामान विभागाचा अंदाज काय?

राज्यात पुढील आठवडाभर (Maharashtra Weather Update) पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 21 व 22 मे रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळं देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुढील 4 ते 5 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात देखील पुढील आठवडाभरात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून, 21 व 22 मे रोजी कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत वाऱ्यासह मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, या अंदाजामुळे केरळ, तसेच महाराष्ट्रात देखील मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

हे ही वाचा