Mumbai Mahanagar Palika Election : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे (Mumbai Mahanagar Palika Election)  बिगुल वाजलं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. येत्या 15 जानेवारीला यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 16 जानेवारीला या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट यांच्यात युती आणि आघाड्यासंदर्भात चर्चा सुरु आहे. अशातच मुंबई महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून काँग्रेसला 50 जागांसाठीचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

एकत्र लढलो तर फायदा होईल अशी नेत्यांची भुमिका 

मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र लढलो तर फायदा होईल अशी नेत्यांची भुमिका आहे. त्यामुळं एकत्र लढण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर आज राष्ट्रवादीच्या  शिष्टमंडळांनी काँग्रेसला प्रसताव दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळं आता मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस एकत्र लढणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

प्रस्तावाच्या संदर्भात उद्या परत काँग्रेस नेते आणि राष्ट्रवादीचे नेते चर्चा करणार

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून देण्यात आलेल्या प्रस्तावाच्या संदर्भात उद्या परत काँग्रेस नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते यांची भेट होणार आहे. काँग्रेसची एकीकडे वंचित सोबत बोलणी सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचाही प्रस्ताव आल्याने काँग्रेसला आता भूमिका घ्यावी लागणार आहे. 

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून आजच  40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून आजच  40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत रेवंत रेड्डी,  वर्षा गायकवाड, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह  40 दिग्गज नेत्यांचा सहभाग करण्यात आला आहे. 

मुंबईत ठाकरे बंधुंची युती तर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी

राज्यातील महापालिका निवडणुकांच्या (Election) पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांच्या बदल्या भूमिका पाहायला मिळत आहेत. मुंबई महापालिका ठाकरेंच्या ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासाठी, उद्याच दुपारी 12 वाजता अधिकृतपणे ठाकरे बंधूंच्या म्हणजेच मनसे-शिवसेना युतीची घोषणा होणार आहे. त्यानंतर, आता पवारांच्या दोन्ही राष्ट्रवादी देखील एकत्र येणार असल्याचं निश्चित झालं आहे. मुंबईतसाठी ठाकरे तर पुण्यासाठी (Pune) पवार एकत्र आल्याचं महापालिका निवडणुकांमुळे पाहायला मिळालं. ठाकरेंनंतर पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र येणार असून 26 डिसेंबर रोजी याची घोषणा होणार असल्याची माहिती स्वत: अजित पवारांनी (Ajit pawar) दिली.