मुंबई : राज्याचे मत्सविकास व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांना समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख (MLA Rais Sheikh) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 10 मुस्लीम सरदारांची यादी दिली आहे. तसेच मंत्री राणे यांचे इतिहासाचे वस्तुनिष्ठ वाचन व्हावे, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन ग्रंथही आमदार शेख यांनी भेट दिले आहेत.
संगमेश्वर (जि. रत्नागिरी) येथील सभेत (13 मार्च रोजी) बोलताना मंत्री नितेश राणे यांनी शिवाजी महाराजांनी कधीही मुस्लीम सरदार ठेवले नव्हते तसेच महाराजांचे युद्ध मुस्लीमांच्या विरोधात होते’, अशी टिप्पणी केली होती. त्यासंदर्भात वस्तुनिष्ठ माहिती पुढे येण्यासाठी आमदार रईस शेख यांनी मंत्री राणे यांना पत्र लिहिले आहे.
मुस्लीम सरदारांच्या यादीसह दिले ऐतिहासिक दस्ताऐवजांचे पुरावे
पत्रामध्ये आमदार रईस शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 10 मुस्लीम सरदारांची नावे दिली आहेत. त्यामध्ये पन्हाळगड वेढ्यात साथ दिलेला सिद्दी हिलाल व त्याचा पुत्र सिद्दी वाहवाह, घोडदळ प्रमुख नूरखान बेग, सरदार शमाखान, आरमारप्रमुख इब्राहीम खान, अंगरक्षक सिद्दी इब्राहीम, आरमाराचा अधिकारी दौलतखान, विश्वासू सेवक मदारी मेहतर तसेच वकील काझी हैदर या 10 मुस्लीम सरदारांची नावे आहेत. सरदारांच्या नावापुढे ऐतिहासिक साधनांचे पुरावे देखील आमदार रईस शेख यांनी पत्रात दिले आहेत.
मुस्लीम संत बाबा याकुत यांना शिवाजी महाराज मान देत असत
संत तुकाराम व संत रामदास यांच्याप्रमाणे रत्नागिरीचे मुस्लीम संत बाबा याकुत यांना शिवाजी महाराजांनी मान देत. शिवाजी महाराजांचे राज्य धर्मयुद्ध नव्हते. पीर, दर्गा, मशिद यांची इनामे छ. शिवाजी महाराजांनी कायम चालू ठेवली. याचे संदर्भही या पत्रात जागोजागी दिले असून आपल्या दाव्याच्या पुष्ट्यार्थ आमदार रईस शेख यांनी इतिहासाच्या प्राथमिक साधनांची माहिती पत्रात दिली आहे.
आमदार रईस शेख यांनी मंत्री नितेश राणे यांना पत्रासोबत थोर इतिहासकार जदुनाथ सरकार यांचे ‘छत्रपती शिवाजी : काल आणि कर्तृत्व’ आणि गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता?’ हे दोन ग्रंथ भेट दिले आहेत. आपण वस्तुनिष्ठ इतिहाचे वाचन करावे जेणेकरुन आपण पूर्वग्रहदूषित विधाने करणार नाहीत, ज्यामुळे दोन समुदायांमध्ये तेढ वाढणार नाही, असा सल्ला आमदार रईस शेख यांनी मंत्री नितेश राणे यांना या दिला आहे.
आणखी वाचा