जळगाव: एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक आणि शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांना अटक करण्यात आली आहे. बनावट कागदपत्र तयार करुन फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांना आज कोर्टासमोर हजर केलं असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


 

जळगाव तालुक्यातील म्हसावद इथं पद्मालय शिक्षण प्रसारक संस्था आहे. 1991 साली या संस्थेची स्थापन झाली. त्यानंतर 2012 पर्यंत संस्थेच्या 6 सभासदांचं निधन झालं. मात्र 20 एप्रिल 2008 साली गुलाबराव पाटील यांनी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली. आणि 18 ऑगस्ट 1996 साली मृत पावलेले सभासद महारु काशीनाथ बेलदार सभेला हजर असल्याचं कागदोपत्री दाखवलं. आणि संस्थेची नवीन कार्यकारिणी तयार केली. असा त्यांच्यावर आरोप आहे.

 

याप्रकरणी अर्जुन पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अटक टाळण्यासाठी गुलाबराव पाटलांनी हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. मात्र तो फेटाळून लावला. त्यानंतर गुलाबराव पाटील स्वत: जळगावमधील एमआयडीसी पोलिसांना शरण आले. पोलिसांनी आज त्यांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं. कोर्टानं त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र शिवसेनेच्या आमदाराला अशा प्रकारे फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक होण्याची वेळ आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.