Uttarakhand Cloudburst: उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात मुसळधार (Rain) पाऊस व ढगफुटी झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. अवघ्या 34 सेकंदाच्या ढगुफटीनंतर धारली गाव ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. दरम्यान या घटनेत150 हून अधिक लोक गाडले गेले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
असे असताना महाराष्ट्रातील 150 हून अधिक पर्यटक या दुर्घटनेत अडकल्याचीहि भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) हे उत्तराखंडसाठी रवाना झाले आहेत. महाराष्ट्रातील शेकडो जण अडकले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे रेस्क्यू ॲापरेशनसाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) मदत कार्यासाठी रवाना झाल्याची माहिती पुढे आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार मंत्री महाजन हे उत्तरकाशीसाठी रवाना झाल्याचे पुढे आलं आहे.
महाराष्ट्रातील 151 पर्यटक अडकल्याचा अंदाज
उत्तरकाशीमध्ये महाराष्ट्रातील जवळपास 151 पर्यटक अडकले आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, सगळे पर्यटक सुखरूप आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून अनेकांशी संपर्क साधण्यात आला आहे. 151 पैकी जवळपास साठ पर्यटक अनुमान आश्रम इथे सुरक्षित आहेत. तर काहींचे लोकेशन्स ट्रेस करण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात ढगफुटीमुळे खीर गंगा नदीला मोठा पूर आला. या दुर्घटनेत काहींचा मृत्यू झाला असून अनेक घरांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पर्यटक या दुर्घटनेमुळे उत्तरकाशीमध्ये अडकले आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सांगितले की, "सगळे पर्यटक सुखरूप असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे." बचावकार्य वेगाने सुरू आहे.
मालेगावचे 7 यात्रेकरु अजूनही संपर्कात नाही
उत्तरकाशीमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मालेगावातील सात भाविकांशी कालपासून संपर्क तुटला आहे. ही सर्व भाविक मंडळी गंगोत्रीहून उत्तरकाशीकडे निघाली होती. गंगोत्री दर्शनानंतर परतीच्या मार्गावर असताना त्यांच्याशी संपर्क तुटला होता. उत्तरकाशी परिसरात काल ढगफुटी झाली होती आणि त्यानंतरच या भाविकांशी संपर्क होऊ शकलेला नाही.‘ शुभ यात्री ’ ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत हे कुटुंबीय यात्रेसाठी गेलेले होते. दरम्यान, या यात्रेकरूशी अजूनही संपर्क न झाल्याने त्यांचे नातेवाईक मात्र चिंतेत आहे. भारत सरकार व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने आमच्या नातेवाईकांशी संपर्क करून द्यावा, अशी भावनिक साद ते सध्या घालत आहे.
उत्तराखंडमध्ये विदर्भातील एकही पर्यटक नाही
उत्तराखंडमध्ये ढगफुटीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत महाराष्ट्रातून पर्यटनासाठी गेलेले अनेक पर्यटक तिथं अडकलेत. तर काहींचा संपर्क होत नव्हता. यात मात्र विदर्भातील एकाही पर्यटकाचा समावेश नाही. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, गोंदिया, अकोला, अमरावती, गडचिरोली आणि वर्धा या विदर्भातील जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात कुठल्याही नातेवाईकांनी संपर्क साधला नाही. त्यामुळं विदर्भातून एकही पर्यटक उत्तराखंडला पर्यटनासाठी गेला नाही किंवा तिथं अडकला नसल्याचं स्पष्ट झालं.
इतर महत्वाच्या बातम्या