MIG 21 Retirement : भारतीय हवाई दलाचा भक्कम कणा मानला जाणारा मिग 21 लढाऊ विमान तब्बल सहा दशकांच्या उत्कृष्ट सेवेनंतर आज (26 सप्टेंबर) सेवानिवृत्त होत आहे. कधी काळी आपल्या अपघातामुळे "उडत्या शव पेट्या" म्हणजेच "फ्लाईंग कॉफीन" असे नकारात्मक नाव पडलेले मिग 21 तज्ज्ञांच्या नजरेतून भारताचे एक उत्तम लढाऊ विमान (Indian Air Force) होते. या विमानाने फक्त वेळोवेळी पाकिस्तानी (Pakistan) हवाई दलाचे पितळ उघडे पाडले नाही, तर भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना जगातील सर्वोत्तम वैमानिक बनण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. सहा दशकानंतर कायमस्वरूपी आपल्या हँगरमध्ये परतणाऱ्या मिग-21 (MIG 21 Retirement) या लढाऊ विमानांसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेली खास माहिती आपण एबीपी माझाचा हा खास रिपोर्टमधून जाणून घेऊ.
दरम्यान, 1958 मध्ये तत्कालीन सोवियत रूसने तयार केलेला मिग 21 विमान 1962 पासून भारतीय हवाई दलामध्ये तैनात होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात या विमानाच्या उड्डाणाचे प्रशिक्षण भारतीय वैमानिकांना सोवियत रूसमध्ये जाऊन घ्यावे लागत होते. नंतर मात्र सोवियत रूसने भारताला आपला खास सहकारी मान्य करत या विमानाचा तंत्रज्ञान भारताला देण्यास सुरुवात केली आणि मिग 21 भारतीय हवाई दलाचा प्रमुख लढाऊ विमान बनला.
1) Mig-21 कोणत्या परिस्थिती घेतले गेले? (MIG-21 Information)
मिग 21 भारतासाठी त्याकाळातील सर्वोत्तम आणि भारताच्या तत्कालीन आर्थिक स्थितीमध्ये सर्वाधिक परवडणारा विमान होता. त्या काळामध्ये भारताकडे फारसे अत्याधुनिक लढाऊ विमान नसताना मिग-21च्या स्वरूपात जागतिक दर्जाच्या लढाऊ विमानाची भारताकडील पोकळी तेव्हा मिग-21 मुळे भरून निघाली होती.
तत्कालीन सोवियत संघाने मिग-21चे तंत्रज्ञानही आपल्याला हस्तांतरित करत मिग-21 हे भारतात असेंबल करण्याची परवानगी दिली होती. त्यामुळेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या रूपात भारतात विमानांच्या देखभाल दुरुस्ती आणि निर्मितीचा कौशल्य निर्माण होऊ शकलं.
परिणामी आज आपण "तेजस" विमानाच्या माध्यमातून लढाऊ विमान तयार करू लागलो आहोत. एका प्रकारे मिग 21 ने भारतात लढाऊ विमान तयार करण्याचा पाया रचला. आणि पुढे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची प्रगती होत गेली.
2) Mig-21चे एक दुर्गुण भारतीय वैमानिकांसाठी वरदान कसे ठरले? (Specification of MIG-21)
तज्ञांच्या मते, मिग-21 या विमानामध्ये एक महत्वाचे दुर्गुणही होते, आणि ते म्हणजे त्याच्या कॉकपिटमध्ये वैमानिकासाठी फार कमी जागा होती. त्यामुळे अत्यंत दाटी-वाटी मध्ये बसून वैमानिकाला मिग-21 उडवावे लागायचे.
भारतीय उष्ण हवामानात तर मिग-21चे कॉकपिट वैमानिकांसाठी एक मोठे आव्हान ठरायचे. त्यामुळे मिग 21 हे भारतीय वैमानिकांच्या धैर्य आणि कौशल्याची परीक्षा घेणारा विमान होता. परंतु मिग-21 त्याकाळातील पहिला सुपरसॉनिक, सिंगल इंजिन, सिंगल पायलट विमान होता. तसेच त्या काळातला सर्वात अत्याधुनिक विमान ही होता. त्यामुळे भारतीय वैमानिकांना इतर विमानांच्या तुलनेत मिग-21 खूप आवडायचे. मिग-21 मधील आव्हाने आणि अत्याधुनिकतेमुळेच भारतीय वैमानिक जगभरात सर्वोत्तम वैमानिक म्हणून विकसित होऊ शकले. एकाप्रकारे भारतीय वैमानिकांची कौशल्यनिपुणता मिग-21ने विकसित केल्याचे मत एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी व्यक्त केले.
3) Mig-21 पाकिस्तान वर कसे भारी पडले! (Mig-21 on Pakistan)
पाकिस्तान या भारताच्या शत्रूवर आघाडी प्रदान करण्याचे कामही मिग-21 ने मोठ्या खुबीने केले. 1965च्या युद्धापासून अगदी बालाकोट एअर स्ट्राईकच्या वेळी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याना पश्चिमी सीमेवर परतावून लावण्याचे काम मिग-21 ने केले.
4) Mig-21 ला "फ्लाईंग कॉफीन" का म्हणण्यात आले आणि खरंच जास्त अपघातांसाठी मिग-21 जबाबदार होते का???
वैमानिकांचा प्रशिक्षण नेहमी टप्प्याटप्प्याने करावा लागतो. प्रशिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये विमानाचा तंत्रज्ञान वाढवत नेला जातो, तसेच विमानाची गतीही वाढवत जाते. सुरुवातीच्या काळात भारतीय हवाई दलाकडे "एचटी टू" (हिंदुस्थान ट्रेनर) नावाचा प्रशिक्षण विमान होता. त्याच्यातून प्रशिक्षण घेतलेले वैमानिक नंतर "किरण" विमान उडवायचे. त्यानंतर "हंटर" विमानाचा प्रशिक्षण दिला जायचा आणि हंटर विमान उडवण्यात तरबेज झालेल्या वैमानिकांना मिग-21 दिले जायचे. मात्र मधल्या काळात हंटर विमान हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर वैमानिकांना किरण विमानातून थेट मिग-21 उडवावे लागायचे आणि तिथेच घोळ व्हायचा.
परिणामी मिग-21च्या अपघाताचे प्रमाण वाढले होते. त्यामुळेच काही लोक मिग-21 ला फ्लाईंग कॉफीन म्हणायला लागले होते. मात्र, तज्ञांच्या मते ती चूक मिग-21 ची नव्हती. तर हंटर विमानाच्या सेवानिवृत्तीनंतर वैमानिकांच्या प्रशिक्षणाची एक आवश्यक पायरीच नाहीशी झाल्यामुळे ते अपघात घडत होते.
5) Mig-21 नंतर काय आणि कोण?
सध्या मिग-21च्या जवळपास अडीच स्क्वॉड्रन भारतीय हवाई दलाकडे आहे. मिग-21 नंतर आपण मिग-29, सुखोई-30, मिराज, जग्वार आणि राफाल असे अत्याधुनिक विमान घेतले. मात्र मिग-21 चा उत्तराधिकारी कोण हे आपण बरेच वर्ष ठरवू शकलो नाही. काही वर्षांपूर्वी त्यासाठी स्वनिर्मित "तेजस" विमान निश्चित केले. मात्र अनेक प्रयत्नानंतरही हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड तेजस विमानाची आवश्यक त्या गतीने निर्मिती करू शकत नाही, हे कटू सत्य आपल्याला स्वीकारावेच लागेल. आता सरकारने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरपूर संसाधन दिले असून नवनवीन युनिट सुरू केले जात आहे. सध्या तरी मिग-21 च्या सेवानिवृत्तीने निर्माण होणारी पोकळी फक्त तेजस भरून काढू शकतो. त्यामुळे तेजसच्या उत्पादनाची गती वाढवण्याची गरज असल्याचे तज्ञांना वाटतंय.
इतर महत्वाच्या बातम्या