Parbhani News : राज्यातील बहुतांश जिल्ह्याला पावसाने (Maharashtra Weather Update) अक्षरशः झोडपून काढलं आहे. अशातच मराठवाड्याची (Marathwada Rain) जीवनदायिनी असलेल्या गोदावरी कोपली असल्याचे चित्र मागच्या दोन दिवसांपासून कायम आहे. पाथरी, सोनपेठ, मानवत गंगाखेड, पालम, पूर्णा या 6 तालुक्यात गोदावरीच्या पुराचा फटका बसलाय. आज (24 सप्टेंबर) दुसऱ्या दिवशीही 25 गावांचा संपर्क तुटलाय. मुसळधार पावसामुळे (Rain Update) मोठ्या प्रमाणावर गोदावरीला पाणी आलेले आहे. त्यामुळे गोदावरी तुडुंब भरून वाहत आहे. परिणामी लाखो हेक्टरवरील शेतीपीक पाण्याखाली गेली आहेत. 

Continues below advertisement

कधी नव्हे ते मराठवाड्यात पावसाने इतकी भयावह परिस्थिती निर्माण केली आहे. त्यातच परभणी जिल्ह्यात गोदावरीला अभूतपूर्व पूर आल्याचे चित्र आहे. या पुराचा फटका अनेक गावांना बसला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. परभणी जिल्ह्यात गोदावरीला सलग दुसऱ्या दिवशी पूरस्थिती कायम असून गंगाखेडच्या धारखेड पुलावर पाणी आलं आहे. परिणामी गंगाखेड, पालम, मधील 10, मानवत मधील 1 आणि पाथरी मधील 14 गावांचा संपर्क तुटलेला असल्याचे चित्र आहे.

हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावला 

अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बळीराज्याला बसला आहे. पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, हळद इत्यादी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.  तर अनेक घरांमध्ये पाणी कायम असल्याने संसारूपयोगी साहित्याचे ही नुकसान झाले आहे. प्रशासन परिस्थिती वर लक्ष ठेवून  आहे. तर दुसरीकडे भारतीय सैन्य दलाच्या 2 तर, एसडीआरएफची (NDRF) पथक ही परिसरात तळ ठोकून आहे.  आज पालकमंत्री मेघना बोर्डीकर या नुकसानिची पाहणी करणार आहे.

Continues below advertisement

मराठवाड्यात सध्या अस्मानी संकट आले आहे. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना लष्कराच्या होड्या आणि हेलिकॉप्टरने वाचवण्यात आले. जायकवाडी धरणातून पाणी सोडल्याने गोदावरी नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली. बीड जिल्ह्यातील परळीतील पोहनेर येथे पाणी लोकांच्या घरात घुसले. पोहनेरमध्ये एका गर्भवती महिलेला स्थानिक भोईबंदूंनी होडीतून दवाखान्यात नेले. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात सोळा गावांतून NDRF ने सत्तरपेक्षा जास्त पूरग्रस्तांना सुखरूप बाहेर काढले. यात वृद्ध दाम्पत्य आणि लहान मुलांचा समावेश आहे. धाराशिव जिल्ह्यातील बावीस मंडळांना अतिवृष्टीचा फटका बसला असून, परंडा तालुक्यात महापूर आला आहे. वीसपेक्षा अधिक गावे पुराच्या विळख्यात आहेत. हिंगोलीत शेतात अडकलेल्या नागरिकांना स्थानिकांनी दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले. या अस्मानी संकटामुळे मराठवाड्यात आठ जणांचा बळी गेला असून, कित्येक जण बेघर झाले आहेत. प्रशासन, पोलीस आणि NDRF चे जवान बचावकार्य करत आहेत.