Marathwada Flood Affected Farmers : मराठवाड्यातील (Marathwada) पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मदत निधी मंजूर केला आहे. मात्र, 'प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे दिवाळीनंतरच येतील अशी शक्यता आहे. मराठवाडा विभागामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकरिता सरकारने हा मदत निधी मंजूर केला असून, त्याचा अध्यादेश (Government Resolution) देखील जारी करण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या नुकसानीपोटी सात जिल्ह्यांसाठी 346 कोटी 31 लाख 70 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या मदतीमुळे 3,58,612 शेतकऱ्यांना (3,58,612 Farmers) फायदा होणार आहे, ज्यांचे 3, 88 000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पण निधी वितरणास होणारा विलंब पाहता शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.
पंधरवड्यातील चौथा अध्यादेश जारी, शेतकऱ्यांना 346 कोटींची मदत मंजूर
मराठवाडा विभागात सरलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे 2 ते 3 हेक्टरचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदतनिधी मंजूर केल्याचा अध्यादेश जारी केला आहे. यामध्ये विभागातील 7 जिल्ह्यांसाठी 346 कोटी 31 लाख 70 हजार रुपयांचा समावेश आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे कधी जमा होणार, याबाबाबत अद्याप स्पष्टता नाही.
तर जून ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या नुकसानीपोटी मदतनिधी शासनाने मंजूर केला आहे. 3 लाख 58 हजार 612 शेतकऱ्यांच्या 3 लाख 88 हजार 107 हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीसाठी ही मदत आहे. राज्य शासनाच्या या आर्थिक मदतीमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल, असा दावा करीत असले तरी ही मदत दिवाळीनंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी शक्यता आहे.
जिल्हा मदतनिधी कसा मिळाला?
संभाजीनगर : 81 कोटी 62 लाख
बीड : 67 कोटी 24 लाख
लातूर : 35 कोटी 72 लाख
परभणी : 49 कोटी 42 लाख
जालना : 64 कोटी 75 लाख
हिंगोली : 11 कोटी 30 लाख
नांदेड : 36 कोटी 22 लाख
एकूण 3, 46 कोटी 31 लाख
गेल्या काही दिवसात राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस झाला होता. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले होते. या पुराचं पाणी अनेकांच्या घरात शिरलं होतं. त्यामुळं संसार उघड्यावर होते. तर दुसऱ्या बाजूला जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यावर देखील मोठं संकट आलं होतं. अनेक शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली होती, तर काही शेतकऱ्यांची पिकाबरोबर जमिन देखील वाहूनगेली होता. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान या पुरामुळं झाल्याचं पाहायला मिळालं.