नागपूर : नागपुरातील सीताबर्डी परिसरात अत्यंत गजबजलेल्या झांशी राणी चौकावर एका तरुणाने हातात बंदूक घेऊन अर्धा तास ‘विरुगिरी’ केली. संजय पटेल नावाचा हा तरुण मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील ईश्वरपूर गावातून आज दुपारीच नागपुरात आला होता. संजय सिवनी जिल्ह्यातील घंसौर पोलिस ठाण्यातील काही पोलिसांमुळे त्रस्त होता.
2013 च्या एका जुगाराच्या प्रकरणात तो आरोपी असल्यामुळे तिथले पोलिस त्याला वारंवार चौकशीसाठी बोलवायचे. त्यातच यावर्षी शेती तोट्यात गेल्यामुळे संजय पटेल त्रस्त होता. नैराश्यात आज दुपारी तो बसने सिवनीवरुन नागपूरला आला आणि थेट झांशी राणीच्या पुतळयाजवळ येऊन हातात देसी कट्ट्यासारखी दिसणारी बंदूक स्वतःच्या कनपटीवर ठेऊन आत्महत्येची धमकी देऊ लागला.
झांशी राणी चौकात मोठी गर्दी जमली. पोलिस त्याला खाली उतरण्याची विनंती करु लागले. मात्र, संजय पटेलने त्यांना प्रतिसाद दिला नाही. अखेर काही पोलिसांनी त्याला बोलण्यात गुंतवले आणि एका पोलिस कर्मचाऱ्याने मागून जाऊन त्यावर झडप घातली.
पोलिसांनी संजय पटेलला ताब्यात घेतले आहे. सध्या पोलिसांनी संजय पटेलला अटक केले असून, त्याने बंदूक कुठून आणली, याची चौकशी सुरु केली आहे.
दरम्यान, संजय पटेल याच्याकडे असलेली बंदूक एयरगन असल्याची माहिती आहे. मात्र, पोलिसांनी अजून या माहितीला दुजोरा दिलेला नाही.