सांगली : गाडीला कट का मारला म्हणून डोक्यात टॉमी घालून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कुडणूर या गावात ही घटना घडली आहे. सिद्धनाथ बाबासो सरगर (२५) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. ऐन दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घडलेल्या या खुनाच्या घटनेने जत परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


डफळापूरनजीक असलेल्या कुडनूर या गावचा रहिवाशी असलेला सिद्धनाथ सरगर हा कुडनूर- शिंगणापूर मार्गावरील सरगर वस्ती येथे राहत होता. बुधवारी रात्री खांडेकर वस्तीजवळ रस्त्याच्या कडेला सिद्धनाथचा मयत अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

या घटनेची माहिती तात्काळ स्थानिकांनी पोलिसांना दिल्यानंतर जत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सिद्धनाथच्या डोक्याला जबर मार लागून त्याचा मेंदू बाहेर आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. जत पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केल्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांनी सिद्धनाथचा मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.

सिद्धनाथचा खून त्याच्याच गावातील प्रमोद खांडेकर या तरुणाने केला असल्याचे त्याच्या मामांनी पोलिसांना सांगितले. प्रमोद स्वतः पोलिसांच्या स्वाधीन होण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

घटना काय?

काल सायंकाळी सात वाजता प्रमोद हा त्याची आयशर गाडी घेवून रस्त्याने जात होता. त्यावेळी सिद्धनाथने आयशरला कट मारला व तो पुढे निघून गेला. सिद्धनाथ हा खांडेकर वस्तीजवळ मोबाइलवर बोलत थाबलेला असताना प्रमोदने आयशरमधील टॉमी सिद्धनाथच्या डोक्यात घातली. या माराने सिद्धनाथचा मेंदू बाहेर येवून पडला व तो जागीच ठार झाल्याचे प्रमोदच्या मामाने पोलिसांना सांगितले. रात्री उशीरापर्यत प्रमोद पोलीस ठाण्यात हजर झाला नव्हता.