Yavatmal farmers suicide : एका बाजूला भारत व अमेरिका दरम्यान झालेल्या व्यापार कराराच्या माध्यमातून येणाऱ्या काळात भारतीय शेती क्षेत्राला फायदा होईल की तोटा या संदर्भात वेगवेगळे राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला शेतकरी आत्महत्यांसाठी (farmers suicide) नेहमीच चर्चेत राहणाऱ्या यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात जानेवारी महिन्यातील 31 दिवसात तब्बल 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे या आत्महत्यांमध्ये तरुण वर्गातील शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याचे समोर आले आहे.
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये 30 ते 50 या वयोगटातील शेतकऱ्यांची संख्या जास्त
दरम्यान, वर्षाच्या पहिल्याच महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या झाल्यामुळे यवतमाळ जिल्हा प्रशासनही हादरले आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये 30 ते 50 या उमेदीच्या वयोगटातील शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. या गंभीर प्रश्नाबद्दल एबीपी माझ्याने यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांना ही विचारणा केली. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या संख्येने झालेल्या शेतकरी आत्महत्या चिंचेची बाब असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी असं टोकाचे पाऊल उचलून नये असे पालकमंत्री संजय राठोड म्हणाले. आम्ही जिल्हा पातळीवर प्रशासनाच्या मदतीने उपाय योजना करूच. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या मदतीने राज्य सरकारच्या पातळीवरही शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी काही धोरणात्मक उपाययोजना करू असे राठोड म्हणाले. दुसऱ्या बाजूला विरोधकांनी एकाच महिन्यात एकाच जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या झाल्यामुळे सरकारला धारेवर धरले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यापैकी 13 तालुक्यात जानेवारी महिन्यात शेतकरी आत्महत्या घडल्या आहेत.
कोणत्या तालुक्यात किती आत्महत्या?
पांढरकवडा - 2 झरीजामनी - 3घाटंजी - 2महागाव - 1दारव्हा - 1उमरखेड - 1बाभूळगाव - 3 यवतमाळ - 2 दिग्रस - 3नेर - 1कळंब - 1राळेगाव - 1आर्णी - 1
राज्यात विविध कारणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याचे चित्र
दरम्यान, राज्यात विविध कारणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. शेतकरी आत्महत्येला विविध कारणे आहेत. यामध्ये सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, हवामानातील बदल, शेत मालाला भाव नसणे इत्यादी अनेक कारणास्तव मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळं शेतकरी आत्महत्याग्रस्त भागाकडे शासनाने विशेष लक्ष देण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. तसेच आत्महत्यांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी देखील प्रयत्न करणं गरजेचं असल्याची मागणी शेतकरी नेत्यांकडून केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या: