मुंबईः अंगावरून तब्बल 122  हून अधिक गाड्या नेण्याचा पराक्रम एका अवलियानं केला. या पराक्रमानंतर गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्मध्ये नाव नोंदवलं गेलं आहे. पंडित तुकाराम घायगुडे असं या विश्वविक्रमवीराचं नाव आहे. मुंबईतील कालिदास नाट्यगृहाच्या प्रांगणात त्यांनी हा विक्रम केला.

 

एका गाडीचं वजन हे तब्बल 250 ते 300 किलो आहे. ही गाडी 121 वेळा अंगावरुन गेली, तर 122 व्या शेवटच्या खेपेला इंडियाज स्कॉटची तब्बल 450 किलोची गाडी अंगावरुन नेली. अशी 122 गाड्या त्यांनी आपल्या पोटावरून नेल्या. याआधी फक्त 10 गाड्या वाहून नेण्याचा विक्रम होता. त्या विक्रमाला धायगुडे यांनी मागे टाकलं आहे.

 

...म्हणून केला विश्वविक्रम

 

पंडित घायगुडेंनी गिनिज बुकात नाव नोंदवण्याचं स्वप्नं पाहिलं. त्याच स्वप्नाला साकारण्याचा प्रयत्न मुंबईतल्या मुलुंडमध्ये सुरु झाला. एका मागोमागएक गाड्या. पंडित घायगुडे यांच्या अंगावरून जात होत्या. आधीचा 10 गाड्यांचा विक्रम कधीच मोडला होता. पण पंडित यांचा मनसुबा अर्धशतकाचा होता.

 

पण अर्धशतकाने पंडित यांचं समाधान होईना. आता त्यांना शतक खुणावत होतं. शतकही पार झालं आणि पंडित यांनी प्रत्येकी 245 किलोच्या 121 गाड्या अंगावरून नेल्यानंतर 122 वी गाडी तब्बल 450 किलो वजनाची नेली.

 

कोण आहेत पंडित घायगुडे?

 

पंडित घायगुडे मूळचे सांगली जिल्ह्यातील जतचे आहेत. मुंबईत ते 2000 साली आले आणि बकरीमंडी मध्ये कामाला लागले. 2004 पासून  ते ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाई म्हणून काम करत आहेत.

 

पंडित घायगुडे मार्शल आर्टच्या ज्युदो, कराटेसारख्या युद्धकलांमध्ये पारंगत आहेत. पण ज्यांच्यामुळे पंडित घायगुडे यांना सर्वाधिक बळ मिळालं त्या आई-बापांचा ऊर आज अभिमानाने भरून आला.