अमरावती : निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला महिलांनी मारहाण केल्याची घटना अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात घडली. एकूण 10 ते 12 महिलांनी मारहाण केली. बळीराम राठोड असे निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.


राठोड आज काही कामानिमित्त कोर्टात आले असताना काही महिला कोर्टात आल्या आणि त्यांनी राठोड यांना पत्ता विचारला. यादरम्यान राठोड आणि महिलांमध्ये वाद झाला आणि त्यांनी राठोड यांना मारहाण केली. यासंदर्भात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मटक्यांच्या धंद्यांविरोधात लढणारे राठोड

अमरावती शहरातील मटक्याचे धंदे बंद करण्यासाठी माजी पोलिस उपनिरीक्षक बळीराम राठोड हे लढा देत होते. अनेक महिन्यांपासून ते सातत्याने मटक्याचे धंदे बंद करण्याची मागणी करत होते. मात्र त्यांच्या या मागणीकडे पोलिस आयुक्तांनीही दुर्लक्ष केले. त्यामुळे अमरावती शहरात मटक्याचे धंदे सुरुच होते.

बळीराम राठोड यांच्या लढ्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत होते. त्यामुळे कंटाळून स्वत: बळीराम राठोड यांनीच निषेध म्हणून, मुख्यमंत्र, गृह राज्यमंत्री आणि पोलिस आयुक्त यांच्याकडे मटका धंदा सुरु करण्याची परवानगी मागितली होती. त्यानंतर मग पोलिस प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी मटका धंद्यावर कारवाई करत बंद केले.