Supriya Sule on Rupali Chakankar: राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल केवलकरच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ सापडल्याचा दावा केला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या जावयाच्या अडचणी वाढल्याची चर्चा आहे. दरम्यान, या संदर्भात आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी रूपाली चाकणकर यांनी केलेल्या दाव्यांवर बोलताना सांगितले की, रोहिणी ताई खडसे या आमच्या पक्षामध्ये आहेत. मात्र, त्यांच्या नवऱ्याचा आमच्या पक्षाशी कोणताही संबंध नाही. मी कोणाच्याही आयुष्यात बोलत नाही. माझी पातळी सोडून मी कधीही बोलत नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. त्यामुळे माझा या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे त्या म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, आपल्याकडे राईट टू प्रायव्हसी हा कायदा आहे आणि हा कायदा संसद आणि सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. ज्यावेळी एखाद्या आरोपीचा मोबाईल घेतला जातो तेव्हा तो फक्त पोलिसांकडून कोर्टाला दाखवला जातो. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीला तो मोबाईल दाखवला जात नाही. त्यामुळे मोबाईलमधील डेटा बाहेर लीक केल्यास तो गुन्हा असल्याचं हे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्येच म्हटलं आहे ते मी म्हणत नाही, असं म्हटलं आहे. त्यामुळे आमच्या पक्षातील जे कोणी सदस्य असतील त्यांची जबाबदारी माझीच आहे. त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आमचीच आहे. मात्र, सदानंद सुळे यांनी काही सरकारमध्ये गडबड केली, तर ती माझी जबाबदारी आहे. मात्र, वैयक्तिक आयुष्यात काय करतात त्याच्याशी पक्षाचा काही संबंध नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. आम्ही प्रोफेशनल पद्धतीने काम करतो.
मोबाईल कोर्टामध्ये दाखवण्याचा अधिकार फक्त पोलीस यंत्रणेला
मात्र मोबाईल कोर्टामध्ये दाखवण्याचा अधिकार फक्त पोलीस यंत्रणेला आहे. त्यामुळे गैरवापर होत असेल तर हे दुर्दैवी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, तुम्ही चाकणकर यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहात का? अशी विचारणा करत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ते सरकारनं ठरवावं आणि या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायद्याचे जाणकार आहेत आणि कर्तुत्वान आहेत. मुख्यमंत्र्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती असल्याचा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. दुसरीकडे, रुपाली चाकणकर यांनी एकनाथ खडसे यांच्या जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खेवलकर यांच्या मोबाईल फोनमध्ये महिलांचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो सापडले आहेत, असे त्या म्हणाल्या. मानवी तस्करी आणि जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी चाकणकर यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली.
फोनमध्ये काय आढळले?
पत्रकार परिषदेत चाकणकर म्हणाल्या की, प्रांजल खेवलकर यांच्या फोनमधील एका गुप्त फोल्डरमधून 252 व्हिडिओ आणि 1497 अश्लील फोटो सापडले आहेत. त्यांनी दावा केला की हे मुलींना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरले जात होते. या छायाचित्रांच्या आणि व्हिडिओंच्या आधारे जबरदस्तीने वेश्याव्यवसाय आणि मानवी तस्करीची शक्यता नाकारता येत नाही. त्यांनी महाराष्ट्राच्या डीजीपींना पत्र लिहून विशेष तपास पथक (एसआयटी) द्वारे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
गेल्या महिन्यात अटक
गेल्या महिन्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यातील हाय-प्रोफाइल खराडी भागातील एका फ्लॅटवर छापा टाकला होता, जिथून कोकेन, गांजा, हुक्का सेटअप आणि दारू जप्त करण्यात आली होती. या छाप्यात प्रांजल खेवलकरसह सात जणांना अटक करण्यात आली होती. महिला आयोगाने अशीही मागणी केली होती की आरोपींचे मोबाईल फोन, ईमेल, बँक खाती आणि आर्थिक व्यवहारांचीही सखोल चौकशी करावी जेणेकरून संपूर्ण कट उघड होईल. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की, पोलिसांनी आतापर्यंत कुटुंबाला अशी कोणतीही माहिती दिलेली नाही. ही सर्व फक्त माझी मुलगी रोहिणी खडसे यांच्याविरुद्ध एक कट आणि अफवा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
