Gokul Chairman Election : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीला आज (30 मे) अखेर पूर्णविराम मिळाला असून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ यांना अध्यक्षपदाची लॉटरी लागली आहे. नंबर वर्षासाठी ते गोकुळचे अध्यक्ष असतील. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून गोकुळ अध्यक्ष निवडीवरून रणकंदन सुरू असतानाच विरोधी गटातील महाडिक गटाकडूनही कोल्हापूर ते मुंबई पडद्यामागून सूत्रे हलवली जात होती. आता विरोधी संचालिका, भाजप प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक यांनी तसेच त्यांचे पती तथा कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी एकाचवेळी नविद मुश्रीफ यांना अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दिलेल्या शुभेच्छांची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यामुळे नविद मुश्रीफ हे नेमके महाविकास आघाडीचे की महायुतीचे आहेत असा प्रश्न पडला आहे.
अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडल्यानंतर मुश्रीफ समर्थकांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात तसेच गोकुळच्या प्रांगणात एकच जल्लोष केला. गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यानंतर काही वेळामध्येच शौमिका महाडिक आणि आमतदार अमल महाडिक यांनी इन्स्टा पोस्ट करत त्यांच्या अभिनंदनाची पोस्ट केली. त्यामुळे राजकीय भूवया उंचावल्या आहेत. विरोधी शौमिका महाडिक यांनी गोकुळच्या नेत्यांना धारेवर धरत तसेच गोकुळच्या सर्वसाधारण सभेतून अत्यंत आक्रमकपणे भूमिका मांडली आहे. सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तुटून पडणाऱ्या शौमिका महाडिक यांनी थेट अभिनंदनाची पोस्ट केल्याने चांगली चर्चा रंगली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गोकुळच्या अध्यक्षपदावरून वाद रंगला होता. त्यामागे खासदार धनंजय महाडिक यांचीही भूमिका होती, असेही बोलले जात आहे. अध्यक्षपदी आमदार सतेज पाटील यांना मानणाऱ्या संचालकांपैकी एकाला अध्यक्षपदाची संधी देण्यात येणार होती. मात्र त्यांनी पडद्यामागून केलेल्या डावामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी अध्यक्ष महायुतीचा झाला पाहिजे, असा निरोप नेत्यांपर्यंत पोहोचवल्याने त्यांना उमेदवार बदलावा लागला. त्यामुळेच नविद मुश्रीफ यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत सतेज पाटील यांना धक्का बसल्याची चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे का? असा सुद्धा आता प्रश्न उपस्थित झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या