नागपूर : हिवाळी अधिवेशनासाठी (Winter Assembly Session)  नवाब मलिक (Nawab Malik) आज हजेरी लावणार आहेत.मलिक सध्या वैद्यकीय जामिनावर बाहेर आहेत. अधिवेशनात मलिक हे अजित पवार गटाच्या आमदारांसोबत बसतात, की शरद पवार गटाच्या आमदारांसोबत ते पाहावं लागेल.  आपण तटस्थ आहोत अशी भूमिका मलिक यांनी आतापर्यंत घेतली होती.  नवाब मलिक आज विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार आहे. कामकाजात सहभागी होताना नवाब मलिक नेमके कोणत्या गटासोबत बसणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही.


नवाब मलिक यांच्याकडून अद्याप तरी तटस्थ म्हणू भुमिका जाहीर करण्यात आली आहे. एबीपी माझाला मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या आमदारांची वेगवेगळी बसण्याची व्यवस्था होणार नाही. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीत गट म्हणून अद्याप दोन्ही नेत्यांना मान्यता नसल्याने सर्व आमदार एकत्रीत बसण्याची शक्यता आहे. सभागृहात त्यामुळं आमदारांची नेमकी भूमिका काय हे पाहणे महत्त्वाचे आहे. पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीने चतुराईने हा प्रश्न सोडावला होता. 


राष्ट्रवादीतील फुटीनंतर पाठिंबा कोणाला जाहीर केलेलं नाही


फेब्रुवारी 2022 मध्ये ईडीनं गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली नवाब मलिक यांना अटक केली होती. त्यानंतर नवा मलिकांनी प्रकृती अस्वास्थतेचं कारण देत अनेकदा जामीनासाठी अर्ज केला होता. गेल्या वर्षभरापासून मलिक कोर्टाच्या परवानगीनं कुर्ल्यातील खासगी रूग्णालयात घेत होते. मलिकांनी बऱ्याचदा जामीनासाठी अर्ज केला होता. पण त्यांचा जामीन अर्ज वारंवार फेटाळण्यात आला होता. अखेर 11 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयानं मलिकांना मोठा दिलासा देत, वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला होता. जामीनाची मुदत संपत असल्यामुळे मलिकांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज त्याप्रकरणी सुनावणी झाली आणि सर्वोच्च न्यायालयानं दिलासा देत नवाब मलिकांच्या जामीनाला मुदतवाढ दिली आहे. परंतु राष्ट्रवादीतील फुटीनंतर आपला पाठिंबा कोणाला याबाबत त्यांनी अद्याप जाहीर केलेलं नाही.


चर्चांना आज अधिवेशनात पूर्णविराम मिळण्याची शक्यता


राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिकही अजित पवार गटाच्या गळाला लागल्याची चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. मात्र त्या चर्चाच होत्या आतापर्यंत नवाब मलिकांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. त्यामुळे मलिक हे शरद पवार की अजित पवार गटाच्या बाजूला बसणार या चर्चांना आज अधिवेशनात पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. 


हे ही वाचा :


विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; मराठा आरक्षणाचं काय? नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर होणार? याकडे राज्याचं लक्ष