Winter Assembly Session : पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई फेकीनंतर विधान भवन परिसरात शाई पेन नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने यंदा प्रथमच विधान भवन (Winter Assembly Session) परिसरात शाईचे पेन घेऊन जाण्यास प्रतिंबध घातला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनीही शाई पेनवर बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली.
आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन (Winter Assembly Session Nagpur) सुरू झाले आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांपासून पक्षाचे कार्यकर्ते आपल्या नेत्यांना भेटण्यासाठी येत आहेत. आमदार, खासदारांचे पत्र घेऊन कार्यकर्ते एका दिवसाचा पास बनवून विधानभवन परिसरात फेरफटका मारताना दिसत आहे. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून विधान भवन परिसरात येताना सोबत शाई पेन असे नये याची काळजी सुरक्षारक्षक घेत आहेत. शाईचा पेन (Ink Pen) आतमध्ये नेता येणार नसल्याचे सांगितल्याने काहींनी आपल्या वाहन चालकांजवळ आपले पेन दिले. मात्र अनेकांचे वाहनचालक परिसर सोडून परत गेल्याने अनेकांना तासभर वाहन चालकाची प्रतिक्षा करावी लागली.
पोलिसांकडून तपासणी
विधानभवन परिसरात येणाऱ्या सर्व व्यक्तींचे पेन तपासण्यात आले. त्यामुळे सरकारने शाई प्रकरणाचा चांगलाच धसका घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, सुरक्षेच्या दृषीने खबरदारी घेण्यात येत आहे. कारण सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची आहे. त्यामुळे ही तपासणी करण्यात आली आहे. महापुरुषांबद्दल भाजप नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते अनेकांच्या रडारवर आहेत. यामुळे काही नेत्यांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. त्याच्यावर शाई फेक होण्याच्या भीतीने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी चर्चा आज विधानसभेच्या आवारात होती.
पुण्यातील घटनेचा धसका
पुण्यात समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकली होती. या प्रकारानंतर गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी एका पत्रकारावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईनंतर राज्यभरातून सरकारवर टीका होऊ लागली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी ही कारवाई मागे घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर एका ठिकाणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यक्रमात पत्रकारांचे पेन तपासण्यात आले होते. त्यानंतर विधिमंडळाच्या अधिवेशनातही याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या