Uddhav Thackeray on Raj Thackeray: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सामनाला दिलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला. या दुसऱ्या भागामध्ये उद्धव ठाकरे यांनी ऑपरेशन सिंदूर, राज ठाकरे यांच्यासोबत युती आदी प्रश्नांवर भाष्य केलं. दरम्यान, सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या राजकीय युतीवर भाष्य केलं. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना थेट प्रश्न विचारत राज ठाकरे यांच्याशी आपली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट चर्चा होणार आहे का? असं सवाल केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मापक शब्दांमध्येच मात्र थेट उत्तर दिलं.
आता सुद्धा मी फोन उचलून बोलणी करू शकतो
उद्धव ठाकरे म्हणाले की मी थेट चर्चा केली तर काय अडचण आहे का? आता सुद्धा मी फोन उचलून बोलणी करू शकतो. तो सुद्धा मला फोन करू शकतो. आम्ही चोरून भेटणार्यांपैकी नाही. आम्ही भेटलो तर उघडपणे भेटू. यामध्ये कोणाला काय अडचण असण्याचे कारण नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. लोकसभेला ज्या पद्धतीने महाराष्ट्र जागा झाला होता त्याच पद्धतीने जागा झाला पाहिजे, आता जाग नाही आली तर कधीच डोळे उघडणार नाहीत असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. दरम्यान आम्ही दोघे एकत्र येणार असेल, तर अडचण काय? अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली. ते म्हणाले की इतरांच्या अडचणी असेल तर मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आम्ही दोघे एकत्र आल्यानंतर इतर भाषिकांना सुद्धा आनंद झाला. इतकेच नव्हे तर मुस्लिमांना सुद्धा आनंद झाला होता. अच्छा किया आपने अशी प्रतिक्रिया उमटल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
दरम्यान उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्राच्या प्रश्नांवर चर्चा झाली आहे का? असा सवाल राऊत यांनी केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, चर्चा झालेली नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या सहकाऱ्यांच्या ज्या काही भानगडी समोर येत आहेत त्या मोडीत काढल्या पाहिजेत. हा माझा टोमणा नसून हे त्यांना आवाहन असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की या सगळ्या भानगडीमध्ये देवेंद्र फडणवीस बदनाम होत आहेत.
सरकारवर काही दबाव होता का?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑपरेशन सिंदूरवरून सवाल उपस्थित केला आहे. जेव्हा सैन्याने धाडस दाखवले, तेव्हा सरकारने त्यांचे पाऊल का थांबवले? सरकारवर काही दबाव होता का? ते म्हणाले की सैन्याच्या शौर्याचे श्रेय कोणत्याही सरकारला जाऊ नये. 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव यांनी हे मुद्दे सांगितले. 21 जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सर्व विरोधी पक्ष नेते ऑपरेशन सिंदूरचा मुद्दा उपस्थित करणार आहेत. भारत-पाकिस्तान युद्धबंदीवरील डोनाल्ड ट्रम्पच्या दाव्यांवरही विरोधकांना सरकारकडून उत्तर हवे आहे. ट्रम्प यांनी शुक्रवारी दावा केला होता की या युद्धात किमान 5 विमाने पाडण्यात आली. तथापि, त्यांनी ही जेट विमाने कोणत्या देशाची होती हे उघड केले नाही. यासंदर्भात राहुल यांनी शुक्रवारी एक्स वर पोस्ट केले होते की, मोदीजी, 5 विमानांचे सत्य काय आहे? देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे!
उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग एक दिवसापूर्वी प्रसिद्ध झाला. उद्धव यांनी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीचा पहिला भाग शनिवारी प्रसिद्ध झाला. या दरम्यान ठाकरे म्हणाले की, 'ठाकरे' हा ब्रँड नाही तर महाराष्ट्राची, मराठी माणसाची आणि हिंदूची ओळख आहे. ठाकरे म्हणजे संघर्ष. हे नाव, लोकांचे प्रेम किंवा विश्वास कोणीही चोरू शकत नाही. काही लोकांनी ही ओळख पुसण्याचा प्रयत्न केला, पण ते स्वतःच पुसले गेले. शिंदे गटावर टीका करताना ते म्हणाले की, ज्यांच्याकडे काहीही नाही आणि जे आतून पोकळ आहेत त्यांना ठाकरे ब्रँड मदतगार वाटतो. ही या ब्रँडची खासियत आहे. शिंदे गट हा ब्रँड चोरत आहे आणि स्वतःला त्याचे भक्त म्हणवून त्याचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या