Ashok Chavan : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आदर्श प्रकरणात ज्या भाजपने हैराण करून आरोपांची राळ उडवून दिली त्याच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करत काही तासांमध्येच राज्यसभेची खासदारकी सुद्धा पदरात पाडून घेतली. भाजपमध्ये पदासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले असतानाच त्यांनी थाटात प्रवेश करून टाकला. तेच अशोक चव्हाण एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर होते. यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी कोणतीही थेट टीका केली नाही. किंवा भाजप प्रवेश कसा घडून आला? हे सुद्धा त्यांनी थेटपणे सांगण्याचा प्रयत्न केला नाही. अनेक प्रश्नांना ते सावधपणे सामोरे जाताना दिसून आले.
भाजप प्रक्षप्रवेश केल्यानंतरही मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असा उल्लेख केलेल्या अशोक चव्हाण यांच्या राजकीय संस्कृती लक्षात येते. आता तेच अशोक चव्हाण देशात बहुसंख्याकांचे आणि धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा राबवत असलेल्या भाजपमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण यांना ती राजकीय कुसपालट मानवणार का? किंवा मतदारसंघात जय श्रीराम नारा देणार का? असा थेट सवाल करण्यात आला. यावेळी त्यांनी सुटसुटीत उत्तर देत वेळ मारून नेली.
काय म्हणाले अशोक चव्हाण?
ते म्हणाले की, जय श्रीराम म्हणजे आम्ही राम मानत नाही का? मी राम मंदिर सोहळ्यावेळी रामाचे पोस्टर लावले होते. ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान, ही माझी स्लोगन होती. राम काही एका पक्षाचा आहे असा काहीच नाही. रामाला मानणं हा राजकीय भूमिकेचा विषय नाही. जय श्रीराम म्हटलं वावगे काय आहे? मराठवाड्यात भूमिका घ्यायची वेळ आल्यास नक्की घेऊ.
ते गेल्या अनेक दशकांपासून आमचं कुटुंब काँग्रेसला मानणारं आहे. आम्ही जिल्ह्यामध्ये काँग्रेस मनापासून वाढवली. पर्यायी विचार करावा लागतो तो मी केला. कार्यकर्त्यांना मी जबरदस्ती केली नाही, तुम्ही तुमचा निर्णय घेण्यास सक्षम आहात असे सांगितलं आहे. मी व्यक्तीगत पातळीवर टीका केलेली नाही.
दुसरीकडे, राज्यातील राजकीय वातावरणावरही माझा कट्ट्यावर अशोक चव्हाण यांना बोलतं करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, कसलेल्या अशोक चव्हाण यांनी सर्वपक्षीय नावे घेत कोणत्याच एका पक्षासाठी परिस्थिती अनुकूल नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, केंद्रात मोदी सरकार येईल, असे त्यांनी थेटपणे सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या