मुंबई : वाजपेयी शासन होतं, पण 2014 नंतरच्या कालावधीचा विचार केल्यास एवढी वाईट परिस्थिती देशात कधीच नव्हती. ही परिस्थिती राहिली आणि समविचारी पक्षांनी एकत्र आलो नाही, तर 2019 नंतर निवडणूक होतील का, अशी भीती मनात आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले. अशोक चव्हाण यांच्या मताला दुजोरा देणारा सूर, चर्चासत्रातील सहभागी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार राजू शेट्टी यांनीही व्यक्त केला.

लोकशाहीविरोधी मोदी सरकार गेलेच पाहिजे, अशी भूमिका घेत 'फ्रेंड्स ऑफ डेमोक्रॅसी’नं एका फोरमची स्थापना केली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने समविचारी राजकीय पक्षांनी एकत्र येऊन एक राजकीय फळी निर्माण करावी, यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यात राज्यातले सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते.

अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले?

“वाजपेयी शासन होतं, पण 2014 नंतरच्या कालावधीचा विचार केला एवढी वाईट परिस्थिती देशात नव्हती. हीच परिस्थिती राहिली आणि आपण एकत्र आलो नाही, तर 2019 नंतर निवडणूक होतील का अशी भीती मनात आहे.”, असे अशोक चव्हाण म्हणाले.

तसेच, “सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुद्धा पत्रकार परिषद घेतात. देशात असं कधीही घडलं नव्हतं.” असे म्हणत चव्हाण पुढे म्हणाले, “इतकं असून ते निवडणुका का जिंकतात? मनी पॉवर आणि मसल पॉवर. पैशाचा प्रचंड दुरुपयोग सुरु आहे. सत्तेचा दुरुपयोग करतात. गपचूप बस, नाहीतर ट्रायल फेस करा, नाहीतर आमच्याकडे ये. पुढच्या सहा महिन्यात देशात उद्रेक राहिल्याशिवाय होणार नाही.”

माध्यमांची साथ आवश्यक आहे. विरोधीपक्षाला स्पेस मिळत नाही. माध्यमांना सांगतो, दोन्ही बाजू आल्या पाहिजेत. आमची बाजूही लोकांपर्यंत आली पाहिजे, अशी आशाही चव्हाणांनी व्यक्त केली.

जयंत पाटील काय म्हणाले?

“सत्ता येते आणि जाते. दुःख वाटायची गरज नाही. पण आता ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांच्यामुळे चिंता करायची गरज आहे. लोकांच्या मनात अदृश्य भीती आहे. प्रत्येक घटकांच्या मनात धास्ती आहे. प्रसारमाध्यमे, न्यायव्यवस्था, निवडणूक घेण्याची व्यवस्था यावर गेल्या चार वर्ष प्रभाव तयार केला गेला आहे.”, असे जयंत पाटील म्हणाले.

तसेच, इथे बसलेल्या लोकांनी छोटे प्रश्न बाजूला ठेवून लोकशाहीसाठी एकत्र आले पाहिजे. निवडून आल्यावर भांडता येईल, असेही पाटील म्हणाले.

“वाजपेयी सरकार पाहिलं, कितीही झालं तरी वाजपेयी यांनी लोकशाहीची चौकट मोडली नाही. आता जे सत्ताधारी आहेत, त्यांना एक पद्धतीने देश न्यायचं आहे. लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र यायला हवे. कारण नंतर कदाचित निवडणूक होणार नाही.”, अशी भीती जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

राजू शेट्टी काय म्हणाले?

एक शेतकरी चळवळ सोडली तर इतर चळवळी शांत झाल्या आहेत, अशी खंत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. तसेच, महाराष्ट्रातल्या सहकार बुडाला, बँक अवस्था खराब झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

“गोपीनाथ मुंडे यांचा चेहरा आपलासा वाटला म्हणून भोळी आशा घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलो. मात्र सगळ्यात आधी तिथून बाहेर आम्ही पडलो.”, असेही शेट्टी यांनी सांगितले.