Gram Panchayat Election Results 2021 गावगाड्यातल्या राजकीय पटलावर मागील कित्येक सुरु दिवसांपासून सुरु असणाऱ्या हालचाली आणि तर्कवितर्क अखेर सोमवारी निकाली निघाले. कोणत्या गावावर कोणाची सत्ता असणार आणि ग्रामस्थांचा कल कोणाला मिळणार, हे चित्र ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालातून सोमवारी स्पष्ट झालं. एकिकडे भाजप, महाविकासआघाडीकडून निवडणुकीच बाजी मारल्याचा दावा सातत्यानं करण्यात येत आहे, तर दुसरीकडे मात्र आता गावखेड्यात विजयी उमेदवारांच्या मिरवणुका आणि विजयोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. अशाच एका अनोख्या विजयोत्सवानं सध्या साऱ्या राज्याचं लक्ष वेधलं आहे.


पुणे जिल्ह्यातील पाळू ग्रामपंचायतीमध्ये जाखमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दारूण पराभव झाला. जाखमाता देवी ग्रामविकास पॅनलने 7 पैकी 6 जागावर वर्चस्व मिळवलं. या घवघवीत यशा मागे महिलांचा मोठा मोलाचा वाटा होता. त्यामुळं, विजयाचा जल्लोष करत असताना गावातील विजयी उमेदवारांच्या पत्नीनं आपल्या पतीच्या विजयासाठी त्यांना खांद्यावर उचलून घेत मिरवणूक काढत आनंद साजरा केला.


पाळू ग्रामपंचायतीमध्ये संतोष शंकर गुरव यांनी 221 मतांनी विरोधी उमेदवाराचा दारुण पराभव केला. ज्यानंतर त्यांच्या पत्नी, रेणुका यांनी थेट आपल्या पतीलाच खांद्यांवर उचलून घेत गावातून फेरी मारली. गुलाल उधळत कार्यकर्त्यांचा कल्ला होणारी विजयी मिरवणूक आजवर सर्वांनीच पाहिली असेल. पण, खुद्द पत्नीनं असा विजयोत्सव साजरा केल्याचं हे दृश्य अनेकांच्याच चेहऱ्यावर स्मित आणून गेलं.



"गड आला पण सिंह गेला"... क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेले तासगाव तालुक्यातील ढवळी गावचे अतुल पाटील पॅनेलसहित विजयी


प्रस्थापितांना धक्का


राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल हाती आले. ज्यानंतर सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा करण्यात येत आहे. या निवडणुकीत भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. तर महाविकास आघाडीतील पक्षांनाही काही ठिकाणी धक्का बसला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीत प्रस्थापितांना धक्का देत नवख्यांच्या हाती सत्ता आल्याचे पाहायला मिळाले.