उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये चार दिवसांपूर्वी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीनेही टोकाचं पाऊल उचललं आहे. पतीपाठोपाठ पत्नीनेही आत्महत्या केली असून तिने अवघ्या 20 दिवसांपूर्वी एका मुलीला जन्म दिला होता.


 
कळंब तालुक्यातील पाडोळी गावात ही हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. 32 वर्षीय महिंद्रा श्रीराम टेकाळे या शेतकऱ्याने 24 तारखेला आपलं आयुष्य संपवलं होतं. कर्जबाजारीपणा आणि सततच्या नापिकीला कंटाळून त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर चारच दिवसांत पहाटे त्याच्या 27 वर्षीय पत्नीने पेटवून घेऊन आत्महत्या केली.

 
सुप्रिया यांनी 20 दिवसांपूर्वीच एका मुलीला जन्म दिला होता. दाम्पत्याच्या आत्महत्येमुळे 20 दिवसांची चिमुरडी आणि मोठी 4 वर्षांची मुलगी पोरकी झाली आहे. या घटनेमुळे समस्त पाडोळी गाव सुन्न झालं आहे.