सिंधुदुर्ग : अग्नीच्या साक्षीने सप्तपदी चालून साता जन्माचा जोडीदार म्हणून निवडलेल्या पतीच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन कोरोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनमुळे त्यांच्या पत्नीला व्हिडीओ कॉलिंग वर घ्यावे लागल्याची  हृदयद्रावक व मन सुन्न करणारी घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावी घडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओढवलेल्या या प्रसंगामुळे हा विषाणू जेवढा विषारी आहे. तेवढाच क्रूर देखील असल्याचे या प्रकारावरून समोर आलं.


संपूर्ण देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. त्यामुळे आपल्या आप्तस्वकीयांच्या सुख दुःखाच्या क्षणात कोणालाच सामील होता येत नाही. असाच एक दुःखाचा डोंगर कोसळला दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावातील एका महिलेवर.


या महिलेचे पती चंद्रकांत बांदेकर, वय 65 हे मुंबई अंधेरी येथे राहतात. तर त्या गावी मोर्ले येथे. कोरोनाच्या या संकटाच्या काळात चंद्रकांत बांदेकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने मुंबईत निधन झाले. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांचे पार्थिव गावी आणता येणे शक्य नव्हते. तेव्हा गावाहून कोणी व्यक्ती मुंबईला जाणे शक्य नाही. अखेर त्यांच्या पत्नीला आपल्या पतीचे अंतिम दर्शन व्हिडीओ कॉलिंग करून घ्यावे लागले. मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे मोर्ले गावात हळहळ व्यक्त होत आहे.