Imtiaz Jaleel Majha Vision : चारशे वर्षांपूर्वीच्या औरंगजेबचा हिशेब इम्तियाज जलीलला का विचारता? मी आमदार, खासदार होतो, लोकप्रतिनिधी असूनही फक्त मुसलमानांवरून प्रश्न विचारले जातात, पण मी एक सांगतो, देशातील मुसलमानांचा मुघलांचा संबंध नाही.  औरंगजेबला तुम्ही जिवंत केलं, अशा शब्दात एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी 'माझा व्हिजन' मांडले. छावा चित्रपटानंतर औरंगजेबवर बोलायला भाजपने भाग पाडल्याचा आरोप सुद्धा जलील यांनी केला. अबू आझमींच्या मतदारसंघात सर्वाधिक ड्रग्जचा धंदा होत असताना का बोललं जात नाही? अशी विचारणा त्यांनी केली. देवेंद्र फडणवीसजी तुम्हाला यामधून काय मिळवायचं आहे? असेही ते म्हणाले. 



एबीपी माझाच्या माझा व्हिजनमध्ये बोलताना जलील यांनी सांगितले की, हिंदू, हिंदू करून काय मिळणार आहे? देवेंद्र फडणवीसजी तुम्हाला यामधून काय मिळवायचं आहे? अशी विचारणा त्यांनी केली. ते म्हणाले की, भर संसदेत भाजपच्या नेत्यांकडून कठुआ, आतंकी शब्द वापरले गेले. धर्माच्या धंद्यात शिकलेला सुद्धा अडाणी होत असल्याचे त्यांनी सांगितले.


औरंगजेबला तुम्ही जिवंत केलं


चारशे वर्षांपूर्वीच्या औरंगजेबचा हिशेब इम्तियाज जलीलला का विचारता? असे सांगत जलील यांनी चारशे वर्षांपूर्वीच्या औरंगजेबला तुम्ही जिवंत केलं असल्याचे म्हणाले. कोणताही मुस्लीम मुघलांशी संबंध जोडत नसल्याचे ते म्हणाले.



नागपूर हिंसारात हात असल्यास त्या मुसलमानांवर कारवाई करा 


नागपुरात झालेल्या हिंसाचारात फहीम खान मास्टरमांईंड असल्याचे समोर आलं आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, तेथील  स्थानिक आमदाराने बाहेरून झुंड आल्याचा आरोप केला. यावर जलील पोलिसांची गुप्तचर यंत्रणा काय करत होती? त्यांना का माहिती मिळाली नाही? अशी विचारणा केली. जर दंगलीत मुसलमान जबाबदार असतील, तर कारवाई करावी. मात्र, कारवाई एकतर्फी करू नये, असे ते म्हणाले. नितेश राणे यांनी केलेल्या भडकावू वक्तव्यानंतर त्याचक्षणी एफआयआर नोंदवायला हवा होता, असे ते म्हणाले. 


बटेंगे तो कटेंगे नव्हे, तर एक रहेंगे तो मजबूत रहेंगे हाच आमचा नारा


एमआयएमच्या बदलत्या सुरावर ते म्हणाले की बाळासाहेबांची शिवसेना राहिली आहे का? काळ बदलला आहे. बटेंगे तो कटेंगे नव्हे, तर एक रहेंगे तो मजबूत रहेंगे हाच आमचा नारा असल्याचे त्यांनी सांगितले. एमआयएम पक्षाचे नाव बदलण्यावर विचारताच त्यांनी अकाली दलला का विचारत नाही? अशी विचारणा केली. काम महत्वाचं असून नाम महत्वाचं नसल्याचे जलील यांनी सांगितले. आम्ही दलितांना, ओबीसींना निवडून आणलं. उत्तर प्रदेशात राजपूतही आमचच्या पार्टीत आहेत, असे जलील म्हणाले.