पुणे : सर्वांसाठी पावसाळा आवडीचा असला तरी अवकाळी पाऊस मात्र प्रत्येकाची दैनाच उडवतो. वीज यंत्रणेसाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील एक ओवी तंतोतंत लागू होते. ते म्हणतात ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’. वीज कर्मचाऱ्यांसाठी मान्सून पूर्वीचा (अवकाळी) पाऊस एका युद्धाच्या प्रसंगापेक्षा कमी नाही. दहा-पंधरा मिनिटाच्या वादळात होत्याचं नव्हतं होतं. मोठ-मोठी जुनी झाडे अक्षरश: उन्मळून वीज वाहिन्यांवर पडतात आणि तारेमुळे दोन्ही बाजुचे पाच-दहा खांब एक झाडं जमीनदोस्त करतं. बरं हे काही एकाच ठिकाणी होत असं नाही. त्यात विजेचा कडकडाट असेल तर खांबावरील चिनी मातीची इन्सूलेटर (चिमणी) फुटतांत आणि वीज वाहिन्या बंद पडतात, आणि सुरु होतो वीज कर्मचाऱ्यांचा युद्धापातळीवरील कामाचा प्रवास.


वीज वायरलेस नाही हे आपण जाणले तरच आपल्याला ‘ती’ का जाते यामागची कारणे समजून घेता येतील. ही अशी यंत्रणा आहे की ती चालू अथवा बंद करण्यासाठी व्यक्तीची गरज लागते. शिवाय या यंत्रणेत जिवाची जोखीम असते. जर रात्री-अपरात्री गेलेली वीज काही वेळाने येत असेल तर तिच्या येण्यामागे कोणी दैवी शक्ती नसून आपल्या सारख्याच हाडामासाच्या व्यक्तीचे कष्ट आहेत. जो आपल्या जिवाची तमा न बाळगता भर पावसात किंवा अंधारात अगदी निर्जन ठिकाणी स्वत:चा जीव धोक्यात घालून खांबावर काम करत असतो. तेंव्हा कुठे वीज येते, सगळं प्रकाशमान होतं. 


विविध स्त्रोतांपासून देशाच्या कानाकोपऱ्यांत तयार केलेली वीज ग्राहकांच्या दारात आणण्यासाठी लाखो किलोमीटर वीज वाहिन्यांचे जाळे (Grid) देशात सर्वदूर पसरलेले आहे. हा सारा पसारा उघडा आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींचा या यंत्रणेवर तत्काळ परिणाम होवून त्यात बिघाड होण्याची दाट शक्यता असते. चक्रीवादळ, पूर, रस्ते अपघात यामुळे ही यंत्रणा कधी-कधी ठप्प होते. आकाशात विजेचा कडकडाट सुरू झाला की दोन विद्युत चुंबकीय क्षेत्र एकत्र आल्याने दाब वाढतो व यंत्रणा बंद पडते. तशी सोयच यंत्रणा वाचविण्यासाठी केलेली असते. 


चिमणी फुटते म्हणजे काय होतं ? 
 
दुसरी बाब म्हणजे वीज खांबात वीज पुरवठा उतरू नये यासाठी चॉकलेटी रंगाचे चिनीमातीचे इन्सुलेटर (चिमणी) खांबावर बसविले जातात. बहुधा हे इन्सुलेटर उन्हामुळे किंवा वीजप्रवाहामुळे गरम होतात व त्यावर पावसाचे थेंब पडताच त्याला तडे जातात. त्या तड्यामुळे  वीजप्रवाह खांबात व खांबातून जमिनीत उतरतो. अन् लागलीच आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होवून फिडर (वीज वाहिनी) बंद पडतो. जर हा फिडर बंद पडला नाही तर जिवित अथवा वित्त हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे फिडरला ब्रेकरची व्यवस्था केलेली असते. ब्रेकर एक प्रकारे सुरक्षा कवचाचे काम करतो.



काम चालू आहे, थोडं थांबा …



जेंव्हा-केंव्हा वीजपुरवठा अचानक खंडित होतो, त्यावेळी वीज उपकेंद्रातील कर्मचारी जवळच्या उपकेंद्राशी संपर्क साधून त्यांच्याकडे वीजपुरवठा आहे की नाही याची खात्री करत असतात. वीजपुरवठा असल्याची खातरजमा झाल्यानंतर फिडर चालू केला जातो. जर फिडर पुन्हा ट्रीप झाला (बंद पडला) तर मात्र बिघाड झाल्याचे घोषित केले जाते. बिघाड शोधणे तेवढे सोपे नसते. ऊन-वाऱ्याची, पावसाची किंवा अंधाराची पर्वा न करता ही शोधमोहीम हाती घेतली जाते. कधी बंद पडलेल्या वाहिनीवरील सर्व खांब तपासावे लागतात. तर कधी हा बिघाड काही खांबादरम्यान सापडतो. 


चूक झाली की जीव जाणार, याची खूणगाठ मनाशी बांधूनच जनमित्राला खांबावर चढावे लागते. सर्व प्रकारच्या काळज्या घेवूनही वीज कर्मचारी प्राणांकित अपघातात बळी पडल्याच्या घटना अधून-मधून घडतात. परंतु, मानवी संवेदना इतक्या क्षीण झाल्या आहेत की एखाद्याच्या जीवनाचे मोलही आपण ध्यानात घेत नाहीत, असो. तर वीज जाते अन् येते या दरम्यान काय होते ? याचा विचार आपण जेंव्हा करु त्यावेळी आपण महावितरण किंवा कोणत्याही वीज कर्मचाऱ्याला दोष देणार नाहीत हे नक्की.


वीज गेली असेल तर १०-१५ मिनिटे थांबा. त्यानंतरच वीज यंत्रणेशी संपर्क साधून आपल्या तक्रारीची नोंदणी करा. त्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत.


• मोबाईल ॲप :- प्लेस्टोअर, विंडोज स्टोअर व ॲपस्टोअरहून महावितरणचे मोबाईल ॲप डाऊनलोड करता येते. या ॲपमध्ये वीजबिलाची माहिती, तक्रार नोंदणी आदी सुविधा सहजपणे उपलब्ध आहेत. त्याचा वापर करा.


• ऊर्जा चॅटबॉटचा वापर करा : आपण मोबाईल ॲप किंवा www.mahadiscom.in संकेतस्थळाचा वापर केला तर आपल्याला उजव्या कोपऱ्यात ऊर्जा चॅटबॉटचे कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित चिन्ह दिसेल. याच्या माध्यमातून आपला मोबाईल क्रमांक किंवा ग्राहक क्रमांक नोंदवून तक्रार नोंदवण्यासह इतर सुविधांचा वापर करु शकता.


• तक्रार कशी नोंदवाल :- विजेसंबंधीच्या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यासाठी १८००२३३३४३५ व १८००२१२३४३५ तसेच १९१२ अशा तीन टोल फ्री क्रमांकाची सोय कंपनीने केली आहे. मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राद्वारे या क्रमांकावर २४ तास सेवा दिली जाते. याशिवाय ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन ०२२-५०८९७१०० या क्रमांकाला साधा मिस कॉल जरी केला तरी वीजपुरवठा खंडित असल्याची तक्रार नोंदवली जाते किंवा NOPOWER <ग्राहक क्र> हा संदेश ९९३०३९९३०३ या नंबरवर पाठवा. आलेल्या तक्रारी विशिष्ट अशा संगणकीय प्रणालीमार्फत संबंधित जनमित्र व अभियंत्यामार्फत पोहोचवल्या जातात. तसेच तक्रारींची सोडवणूक झाली की नाही याची खातरजमा मध्यवर्ती सेवा केंद्रातून केली जाते. यामुळे ग्राहकाची तक्रार योग्य व्यक्तीपर्यंत व वेळेत पोहोचवून त्या वेळेत सोडविल्या जातात. 


• विजबिलाचे अपडेट्स मोबाईलवर :- महावितरण कंपनी सर्व ग्राहकांना वीजपुरवठा व वीजबिलासंबंधीची माहिती SMS वर पाठवत आहे. त्यासाठी ग्राहकांनी स्वत:चा मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदवणे आवश्यक आहे. मोबाईल क्रमांक नोंदविण्यासाठी MREG_<12 अंकीग्राहक क्रमांक> (उदा. MREG 123456789012) असा संदेश टाईप करुन ९९३०३९९३०३ क्रमांकावर पाठवावा. 


कोणती दक्षता घ्यावी…


1. आपल्या घरात ELCB किंवा RCCB ( Residual Current Circuit Breaker)  असणे गरजेचे आहे, जेणेकरून घरातील वीज यंत्रणेत बिघाड झाला तर वीजपुरवठा बंद होऊन  जिवितहानी टाळता येईल. 
2. अर्थिंग सुस्थितीत असावी व गरजेनुसार त्याची तपासणी करावी.
3. वीज उपकरणे किंवा वायरिंग ओलाव्यापासून, किंवा पत्र्यापासून सुरक्षित असावी. 
4. वीज उपकरणे हाताळताना पायात स्लिपर घालावी व वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री करावी.
5. विद्युत खांबाला व ताणाला (stay) जनावरे बांधू नयेत.
6. विद्युत खांबाच्या खाली घर, गोठे किंवा कडब्याची गंजी उभारु नये. 
7. वीजपुरवठा खंडित झाल्यास १० ते १५ मिनिटे थांबूनच वीज कंपनीला संपर्क करावा.
8. बिघाड नेमका कोठे झाला याची माहिती असल्यास वीज कंपनीला संपर्क करावा, जेणेकरुन  तातडीने दुरूस्ती करुन वीजपुरवठा सुरळीत करण्यास मदत होईल.
9. विजेच्या तारा तुटल्यास त्याला हात लावू नये व त्याची माहिती तातडीने वीज कंपनीला द्यावी.
10. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी शेतीपंप, स्टार्टर, वीजमिटरबाबत विशेष दक्षता घ्यावी.  


(या लेखाचे लेखक विकास पुरी, हे बारामती परिमंडलचे जनसंपर्क अधिकारी आहेत)