नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शाह उद्या ‘मातोश्री’वर जाणार आहेत. भाजपच्या संपर्क फॉर समर्थन अभियानांतर्गत ही भेट होणार आहे. पालघर पोटनिवडणुकीनंतर शिवसेना-भाजपमधले संबंध टोकाला पोहोचले असताना ही भेट होत आहे. सत्तेत येऊन चार वर्षे उलटून गेल्यानंतर आता हे संपर्क फॉर समर्थन अभियान भाजपला का सुरु करावंसं वाटलं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचाच शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
संपर्क फॉर समर्थन काय आहे?
मुंबईत सहा जून रोजी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर अमित शाह सात जूनला अकाली दलाच्या प्रकाशसिंह बादल यांना चंदीगढमध्ये भेटणार आहेत. इतके दिवस मोदी-शाहांची भाजप शिवसेनेला कुठलाच भाव द्यायला तयारी नव्हती, मग अचानक असं काय झालं की त्यांना आपल्या मित्रपक्षांशी संपर्क करुन त्यांचं समर्थन मागावंसं वाटलं?
भाजपच्या या बदलत्या रुपाचं उत्तर आहे संपर्क फॉर समर्थन अभियानात. हे अभियान म्हणजे संघाने भाजपला दिलेला कानमंत्र आहे. इंग्लंडमध्ये मजूर पक्षाने आपल्या कामगिरीचं परीक्षण करण्यासाठी लिस्टन टू ब्रिटन्स किंवा लेबर पार्टी लिसन्सचा ऐतिहासिक प्रयोग केला होता. त्याच धर्तीवर देशाच्या विविध क्षेत्रातल्या लोकांचं म्हणणं ऐकण्यासाठी त्यांना अगदी घरी जाऊन भेटायचं, त्यांची सरकारबद्दलची मतं जाणून घ्यायची, असा हा कार्यक्रम आहे. सध्या बौद्धिक वर्तुळात सरकारची जी निगेटिव्ह प्रतिमा बनत चाललीय ती पुसून काढण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. आपल्या पक्षाला, आपल्या विचारसरणीला कशी सर्व स्तरांमध्ये स्वीकृती आहे, हे दाखवण्याचाच हा प्रयत्न.
एनडीएतील पक्षांसोबत संपर्क साधण्याची वेळ कशामुळे?
दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात भाजप-संघाची मंथन बैठक संपली, त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच हे अभियान सुरु झालं. आत्तापर्यंत अमित शाहांनी या अभियानांतर्गत देशाचे माजी लष्करप्रमुख दलबीर सिंह सुहाग, घटनातज्ञ सुभाष कश्यप, माजी न्यायमूर्ती लाहोटी, क्रिकेटपटू कपिल देव, योगगुरु रामदेवबाबा यांची भेट घेतली. पण याच अभियानांतर्गत ते एनडीएच्या घटकपक्षांनाही भेटत आहेत हे थोडंसं मजेशीर आहे. कारण, चार वर्षे जे मुळात तुमच्यासोबत सरकारमध्येच आहेत, त्यांना आता संपर्क करण्याची आठवण होऊन त्यांच्याकडेच समर्थन मागण्याची वेळ का आली? असाही प्रश्न उपस्थित होतो.
एकीकडे विरोधकांची एकजूट वाढत चालली आहे. कर्नाटकात त्यामुळेच शंभरपेक्षा जास्त जागा जिंकूनही भाजपला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. उत्तर प्रदेशात सपा-बसपाची मैत्री आपल्या जागांमध्ये लक्षणीय कपात करेल, अशी भीती भाजपला सतावत आहे. शिवसेना विरोधात लढली तर काय होईल, आपल्याला किती घाम गाळावा लागेल याची चुणूक पालघरच्या निवडणुकीने दाखवून दिली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या घटकपक्षांना पुन्हा चुचकारायला सुरुवात केल्याचं दिसत आहे.
अभियानातून पक्षाची विचारसरणी ठसवण्याचा प्रयत्न?
संपर्क फॉर अभियानात भाजपचा मुख्य फोकस आहे बौद्धिक वर्तुळावर. विशेषतः या वर्तुळावर डाव्या विचारांचा प्रभाव अधिक आहे. सरकारविरोधात जास्तीत जास्त ओरड करणारा, संघाच्या विचारसरणीला घातक मानणारा हाच वर्ग आहे. चित्रपट कलावंत, साहित्यिक, न्यायमूर्ती, प्राध्यापक अशा वर्गामध्ये भाजपला ताकदीचे उजवे समर्थक मिळत नाहीत. त्यामुळेच कदाचित या माध्यमातून आपली विचारसरणी ठसवण्याचा हा पक्षाचा प्रयत्न आहे.
संबंधित बातमी :
अमित शाह 'मातोश्री'वर जाणार, उद्धव ठाकरेंची भेट घेणार
शिवसेनेच्या ताकदीने अनेकांना धडकी भरली : संजय राऊत
माजी क्रिकेटपटू कपिल देव भाजपच्या वाटेवर?
स्पेशल रिपोर्ट : भाजपवर 'संपर्क फॉर समर्थन'ची वेळ का आली?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Jun 2018 05:58 PM (IST)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शाह उद्या ‘मातोश्री’वर जाणार आहेत. भाजपच्या संपर्क फॉर समर्थन अभियानांतर्गत ही भेट होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -