Jaykumar Gore : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा पडून काही तास होत नाही, तोपर्यंत आणखी एक मंत्री आता अडचणीत आला आहे. पहिल्याच प्रयत्नात थेट ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्रीपदाची संधी मिळालेल्या जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. जयकुमार गोरे यांनी स्वत:चे नग्न फोटो महिलेला पाठवल्याचा आरोप होत आहे. जयकुमार गोरे यांच्याकडून सरसेनापती हंबिरराव मोहितेंच्या कुटुंबातील महिलेचा छळ केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मंत्रालयासमोर महिला उपोषण करणार आहे. 


जयकुमार गोरे यांना याच प्रकरणात जेल 


सातारा जिह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे हे सध्या मंत्रीमंडळात ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री आहेत. त्यांना महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मोठी संधी मिळाली आहे. दरम्यान, 2016 मधे काँग्रेसमधे असताना जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वत:चे नग्न फोटो पाठवले होते. असे आक्षेपार्ह फोटो पाठवल्याप्रकरणी जयकुमार गोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अटक टाळण्यासाठी जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने अटकूपर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर जयकुमार गोरे यांना अटक होऊन दहा दिवसांची जेलमधे रवानगीही झाली होती. त्यानंतर त्यांना जाामिन मिळाला होता. 


जुने प्रकरण पुन्हा समोर का आले?


2016 मध्ये जयकुमार गोरे यांना या प्रकरणात जामिन मिळाल्याने या प्रकरणची चर्चा झाली नव्हती. संबंधित महिलेला जानेवारी महिन्यात निनावी धमकीचे पत्र आल्यामुळे तिने पुन्हा जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर संबंधित महिलेनं पत्र पाठवून कारवाईची मागणी केली आहे. 


17 मार्चपासून विधान भवनासमोर आमरण उपोषण करणार


दरम्यान, मंत्री जयकुमार गोरे यांनी 2016 मध्ये आपले विवस्त्र फोटो एका महिलेला पाठवल्याचे प्रकरण पुन्हा समोर आले आहे. या प्रकरणातील महिलेने त्यावेळी दाखल केलेली तक्रार तिच्या नावासहित काही व्हाट्सअॅप ग्रुपवर गेल्या काही दिवसांपासून पूर्वी फिरवली गेली असल्याचा आणि त्याची एक प्रत माझ्या घरी मुद्दाम पाठवली केली असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. याप्रकरणी या महिलेने राज्यपालांना पत्र लिहून मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात 17 मार्चपासून विधान भवना समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील दिला आहे. संबंधित महिला ही सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील असल्याचं राज्यपालांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.


विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल


काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की, राज्यातला एक पैलवान मंत्री, रोज व्यायाम करणारा, तो विवस्त्र फोटो महिलेला पाठवतो. हा मंत्री पश्चिम महाराष्ट्रातील आहे. 10 दिवस जेलची हवा खातो. त्याच्या पलीकडे जाऊन 10 हजारांचा दंड भरून न्यायालयात माफी मागतो. त्यानंतरही तो महिलेच्या मागे लागतो. विवस्त्र फोटो पाठवलेला मंत्री जर मंत्रिमंडळात असेल तर यापेक्षा लज्जास्पद, महाराष्ट्राच्या इतिहासात अशा काळ्या मंत्र्याची यादी रोज वाढत चालली आहे. 


महिला उपोषण करणार, संजय राऊतांचा आरोप 


खासदार संजय राऊत यांनी थेट नाव घेत सरकारला टार्गेट केले. भाजपचे मंत्री, देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत लाडके जयकुमार गोरे यांच्याबाबत हे समोर येत असल्याचे ते म्हणाले. शिवकाळातील सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्याने छळ आणि विनयभंग केल्याचं समोर आले. ही महिला पुढील काही दिवसात विधानभवनासमोर उपोषणाला बसणार असल्याचे ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या