मुंबई : सध्या हिवाळा चालू असल्यामुळे राज्यातील अनेक भागात लोक थंडीने गारठून जात आहेत. ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे दिसत आहेत. असे असताना आता हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात 27 ते 29 डिसेंबरपर्यंत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या काळात खान्देश, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गरपीटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हीच शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कामांचे नियोजन करावे, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाने केले आहे.
कुठे गारपीटीसह पाऊस होणार?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात खान्देश, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 27 ते 29 डिसेंबर या काळात मेघगर्जना, गारपीटीसह पाऊस होऊ शकतो. यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर तसेच दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये 27 डिसेंबर रोजी दुपारपासून हवामानात बदल होण्यास सुरुवात होईल आणि पाऊस बरसेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर 27 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड या भागात वादळी पाऊस होऊ शकतो, असं हवामान विभागाने सांगितले आहे. यातील काही भागात गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
28 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत पाऊस पूर्वेकडे सरकेल
मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांत काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर 28 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत पाऊस पूर्वेकडे सरकेल. हाच पाऊस विदर्भातील इतर जिल्ह्यांत हजेरी लावेल. यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि चंद्रपूर जिल्ह्यांत हा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांतील काही भागांत गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
हवामान, कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
दरम्यान, बदलत्या हवामानाची हीच शक्यता लक्षात घेऊन हवामान विभाग तसेच कृषि विभागाने शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. शेतात असताना गारपीट होत असेल तर सुरक्षित ठिकाणी जावे. विजांचा कडकडाट होत असेल तर झाडाखाली थांबू नये, विद्यूत तारेखाली, रोत्रित्रांजवळ, आसरा घेऊन नेय असे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा :
राज्यातून थंडी गायब! पुण्यात किमान तापमान 19 अंशांवर, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?