मुंबई : मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने हाहाःकार माजवलाय. गेल्या दोन दिवसात मराठवाड्यात सुरु असलेल्या पावसामुळे 11 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती पाण्याखाली गेली आहे. तर राज्यात आतापर्यंत नुकसानाचे पूर्ण पंचनामे झाल्यावर आकडेवारीत आणखी भर पडणार आहे. त्यामुळं राज्यात किती जिल्हे बाधित झालेत याची माहिती घेऊन ओला दुष्काळ जाहीर करायचं की नाही याचा निर्णय घेऊ असं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेट्टीवार यांनी म्हटले आहे.   दरम्यान, मुख्यमंत्री लवकरच नुकसानग्रस्त मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. पाऊस ओसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मंत्री वडेट्टीवार यांनी दिली आहे. 



वर्षभरात पुरामुळे 436 जणांचे बळी गेले आहे. तर सप्टेंबरमध्ये 71 जणांचा  मृत्यू झाला आहे.  दहापैकी सात जिल्ह्यांत 180 टक्के पाऊस झाला आहे. गेल्या दोन दिवसातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा अंदाज येईल. गुलाब चक्रीवादळाआधी 17 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचे वडेट्टीवार म्हणाले.  


Marathwada Flood : धीर सोडू नका, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार : मुख्यमंत्री



 वडेट्टीवार म्हणाले,  472 पैकी 380 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. काही ठिकाणी चाक तर काही ठिकाणी आठ वेळा अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झाले आहे. विहिरी बुजल्या असून जमीन खरवडली आहे.  रस्ते, पूल, सिंचन, वीज विभागाचं सर्वात मोठं नुकसान झाले आहे. 


 


वर्षभरात आलेल्या आपत्तींबाबत केंद्र सरकारकडे वारंवार पत्रव्यवहार करुनही केंद्र सरकारनं कोणतीही ठोस अशी मदत केली नाही, अशी टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तर फक्त सप्टेंबर महिन्यात पावसामुळे 71 जणांचा मृत्यू झाला आहे.. आणि गुलाब चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे नदी, नाले यांचे प्रवाहच बदलून गेलेत.. अशीही माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. 


हेलिकॉप्टर, बोटींनी सुमारे शंभर जणांना वाचवले


एनडीआरएफ जवानांनी तसेच स्थानिक पोलीस यंत्रणेने उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, यवतमाळ भागातील सुमारे शंभर जणांना वाचविले. उस्मानाबादमधून 16 जणांना हेलिकॉप्टरने तर 20 जणांना बोटीने वाचविले. लातूरमध्ये 3 जणांना हेलिकॉप्टरमधून तर 47 जणांना बोटीतून वाचविले. यवतलां आणि औरंगाबादमधून अनुक्रमे 2 आणि 24 जणांना वाचविण्यात यश मिळाले आहे.