ऐन दुष्काळात धुळ्यात पाण्याची नासाडी
एबीपी माझा वेब टीम | 29 Apr 2016 02:53 AM (IST)
धुळे : राज्यात एकीकडे रेल्वेद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे तर दुसरीकडे धुळे महानगरपालिकेच्या धृतराष्ट्र भूमिकेमुळे लाखो लीटर पाणी वाया जाण्याचा सिलसिला सुरुच आहे. महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या जलकुंभ तब्बल दोन तास भरुन वाहत होता. यात शेकडो लीटर पाणी वाया गेलं. 22 एप्रिल रोजी मुंबई-आग्रा महामार्गावरील बाभळे जलशुद्धीकरण केंद्रासमोर तापी पाणी पुरवठ्याची जलवाहिनी फुटली होती. महामार्गावर 50 फुट उंचीचा कारंजा उडाला आणि पाण्याची नासाडी झाली. परिणामी धुळे शहराचा पाणी पुरवठा एक दिवस बंद ठेवण्यात आला होता. या घटनेला एक आठवडा होत नाही, तोच मुंबई-आग्रा महामार्गावरील वरखेडी रस्त्यावरील 10 लाख लीटर क्षमतेचा जलकुंभ गुरुवारी तब्बल दोन तास ओसंडून वाहत होता. महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी हा जलकुंभ ओसंडून वाहत होता त्यावेळी तिथे मनपाचा एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. पाण्याच्या नासाडीला धुळे महानगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभार आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेला जबाबदार का धरु नये, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. पाहा व्हिडीओ