जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील एक अनोखी घटना समोर आली आहे. तामसवाडी गावाजवळील बोरी धरणात एका ट्रकला जलसमाधी मिळाली. पाणी भरण्यासाठी आलेला ट्रक चालक रात्री धरण परिसरात ट्रक लावून झोपला. ट्रक चालक सकाळी उठेपर्यंत ट्रकला जलसमाधी मिळाली होती. बाबासाहेब राजपूत असे या ट्रक चालकाचे नाव आहे. गावकऱ्यांच्या मदतीने ट्रक चालकाला बाहेर काढण्यात आले.

पाणी टंचाईच्या काळात पारोळा शहराला हा ट्रक पाणीपुरवठा करत असे. हा ट्रक दररोज पाणी भरण्यासाठी बोरी धरण परिसरातील विहिरीवर जात असे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने ट्रक चालक सकाळी लवकर पाणी भरता यावे यासाठी रात्री जात. गेल्या तीन वर्ष पासून पाऊस नसल्याने धरण कोरडे होते. त्यामुळे ट्रक चालक थेट विहिरीजवळ ट्रक उभा करून झोप घेत.

नेहमी प्रमाणे 24 जूनच्या रात्री ट्रक चालक धरण परिसरात ट्रक उभा करुन झोपला. पारोळा परिसरात जोरदार पावसाने बोरी नदीला पूर आला. पुराचा प्रवाह वाढून, बोरी धरणात एकाच रात्रीत मोठा जलसाठा झाला होता.

सकाळी ट्रक चालकाला जाग आल्यावर ट्रक पाण्यात वेढलेला होता. हे दृष्य पाहून चालकाची भंबेरीच उडाली.अर्ध्याहून अधिक ट्रक पाण्यात बुडाला. गावकऱ्यांच्या मदतीने ट्रक चालकाला बाहेर काढण्यात आले. मात्र ट्रक काढण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल.धरणातील पाणी साठ्यात वाढ झाल्याने, ट्रकला जलसमाधी मिळाली. ट्रक चालकाला झोपेची मोठी आर्थिक किंमत ट्रक मालकास चुकवावी लागणार आहे.