कोल्हापूर : जिल्ह्यातील कृष्णा नदीतील पाणी पातळी इशारा पातळी जवळ आली आहे. सध्या पाऊस ओसरला जरी असला तरी पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे जर पुन्हा कोयना धरणातून विसर्ग वाढवला गेला तर सांगलीत पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोयना धरणाची पाहणी केली.


कोयना धरणात सद्यस्थितीला 92.17 टीएमसी पाणीसाठा आहे. धरणातून 56,000 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. आतापर्यंत महाबळेश्वर व नवजा येथे अनुक्रमे 5600 व 6200 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आज मितीस या भागात 7300 - 8300 मिमी इतका पाऊस झाला होता. सध्याचे नदीपात्रात सोडलेले पाणी हे म्हैसाळ व टेंभू योजनेतून दुष्काळी भागात दिले जात आहे. नुकसान टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने पाणी सोडणे आवश्यक आहे. अचानक पाऊस वाढला तर पाणी साठविणे अशक्य होईल. संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही करीत आहोत असं यावेळी पाटील म्हणाले. या वेळी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, सत्यजित पाटणकर, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, कार्यकारी अभियंता कुमार पाटील, कार्यकारी अभियंता राजन रेडीयार आदी उपस्थित होते.


पाऊसाचा जोर मंदावल्याने गेल्या तीन दिवसांपासून कृष्णा नदीची वाढणारी पाणी पातळी मंगळवारी सायंकाळी स्थिर होऊन एक इंचाने उतरली आहे. तर मिरज ,नागठाणे, भिलवडी या ठिकाणीही कृष्णा नदीची पाणी पातळी ओसरू लागली आहे. पातळीमध्ये घट होऊ लागल्याने सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू होता, त्याच बरोबर कोयना धरणातून ही पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणीपातळी मध्ये झपाट्याने वाढ झाली होती. मंगळवारी सायंकाळी 5 पर्यंत पाण्याची पातळी 39.01 फुटांवर पोहोचली होती. त्यानंतर पाण्याची वाढ थांबून पातळी स्थिर झाली होती.


मात्र पाण्याच्या वाढल्या पातळीमुळे नदी पूर पट्ट्यात असणाऱ्या दत्तनगर, काकानगर, साईनाथ कॉलनी ,सूर्यवंशी प्लॉट आणि कर्नाळा रोड या ठिकाणी असणाऱ्या शेकडो घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं होतं. पाण्याची पातळी त्यामुळे कृष्णाकाठी भयभीत वातावरण निर्माण झालं होतं. पुन्हा महापुराची परिस्थिती निर्माण होईल का? अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या शेकडो नागरिकांनी स्थलांतर करायला सुरुवात केली होती. मात्र सोमवार(17 ऑगस्ट) पासून पावसाचा जोर मंदावलेला आहे. मंगळवारी (18 ऑगस्ट) दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याने सांगलीच्या आयर्विन पूल याठिकाणी 1 इंचाने आणि मिरजेच्या कृष्णा घाट याठिकाणी 1 फुटाने पाणी पातळी घटली आहे. त्याचबरोबर नागठाणे, भिलवडी आणि अमनापूर याठिकाणी कृष्णा नदीची वाढती पाण्याची पातळी स्थिर होऊन कमी झालेली आहे. झपाट्याने वाढलेल्या कृष्णा नदीची पाण्याची पातळी संथ गतीने ओसरू लागल्याने कृष्णाकाठच्या नागरिकांबरोबर प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.


MLA Ruturaj Patil | कोल्हापुरात "त्याला काय हुतंय? म्हणणाऱ्यालाच हुतोय"ची चर्चा!