Pune Water Crises: धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेने (PMC) अखेर पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार, 4 जुलैपासून एकदिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. त्यापूर्वी प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.


खडकवासला धरण प्रकल्पात केवळ दीड महिना पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्र पाठवले होते. पावसाला विलंब झाल्यास परिस्थिती आणखी चिंताजनक होण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर तीन दिवसांपूर्वी पाणीकपात लागू करण्याची बैठक होणार होती, मात्र ती बैठक रद्द झाल्याने निर्णय लांबणीवर पडला.


पुण्यात पूर्वीपासूनच असमान पाणीपुरवठा आहे. सध्या काही भागात दिवसभर पाणी असते, तर बहुतांश भागात दिवसातून एकदाच पाणी येते. त्यामुळे तेथे पाणीकपात लागू केल्यास नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळणार नाही. त्यामुळे पाणी कपातीनंतरही पूर्ण दाबाने पाणी मिळावे यासाठी पर्यायी दिवशी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


पाण्यासाठी पिंपरी-चिंचवडकर रस्त्यावर
पाण्याच्या कमतरतेमुळे पिंपरी चिंचवड शहरात बऱ्याच ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. शहरवासीयांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळत नसल्याने पालिकेवर मोर्चा काढला होता. नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहे. याबाबत  मार्ग काढण्यासाठी या मोर्चात नागरिकांनी सहभाग घेतला होता. 


राज्यात एकीकडे सत्तसंघर्ष सुरु आहे तर  पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला सध्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जून महिना संपत आला तरीदेखील राज्यासह पुण्यात पुरेसा पाऊस पडला नाही आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच पुणे महापालिकेत अनेक गावांचा समावेश देखील झाला आहे.


हा प्रश्न घेत पिंपरी-चिंचवडकरांच्यावतीने महापालिकेसमोर हांडा मोर्चा काढण्यात आला. त्यात अनेक नागरिकांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. दोन दिवस शहरात पाणी कपातीच्या चर्चा सुरु आहेत. यावर महापालिकेकडून तोडगा काढण्यात येत नसल्याने नागरिक संतापले आहेत. त्यामुळे त्यांनी हांडा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.