वाशीम : देव येतो द्यायला मात्र, पदर नाही घ्यायला, अशी एक म्हण ग्रामीण भागात आहे. हीच म्हण काही वाशिमच्या हिवरा गणपती गावातील शेतकऱ्यांसोबत खरी ठरली आहे. या गावात काही शेतकऱ्यांना एखादी लॉटरी लागल्या सारखी धनादेश पोस्टाद्वारे घरी मिळाले. लॉकडाऊनच्या काळात हे धनादेश मिळाल्याने शेतकरी आनंदी झाले. मात्र, त्यांचा हा आनंद काही जास्त काळ टिकला नाही.
वाशीम जिल्ह्यातील नवसाला पावणाऱ्या गणपती मंदिरामुळे हिवरा गणपती गावाची जिल्ह्यात ओळख आहे. गावात अधिकतर शेतकरी कुटुंब राहतात. लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांकडे खरीप हंगामाची पेरणी करायला पैसे नसल्यामुळे पेरणी करणे कठीण झाले होते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली. मात्र, बोगस बियाणं शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आणि या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. आता पैसे कुठून आणायचे आणि दुबार पेरणी कशी करायची असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला होता.
अशातच दारात पोस्टमन उभा राहतो आणि हातातील लिफाफा देतो. जवळपास तीस शेतकऱ्यांना हे लिफाफे दिले जातात. या लिफाफ्यामध्ये उघडून पाहिले तर बजाज एलायंस कंपनीचे धनादेश. संकट काळी धनादेश पाहून लॉटरी लागल्या सारखा आनंद शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. मात्र, हे धनादेश नेमके आहेत तरी कशाचे हे या शेतकऱ्यांना माहित नाही. तरी, आनंदी झालेले शेतकरी थोडाही विलंब न करता धनादेश वटवण्यासाठी तयारीला लागतात.
शेतकऱ्यांचा हिरमोड
विश्वनाथ अरसोडच्या मते धनादेश पाहून आनंद झाला. मात्र बँकेत गेल्यानंतर चेक वठणार नाही, असं सांगितल्याने हिरमोड झाला. विश्वनाथ यांना काही फायनान्स काढल होत का? विमा काढला होता का? विचारल्यावर त्यांच्या मते हे काढण्यासाठी वेळ मिळाला नाही. अशोक देशमुख यांच्या मते बँकेत धनादेश वठवण्यासाठी गेल्यावर मुदत गेल्याचं समजले आणि थेट बजाज फायनान्सचं कार्यायलय गाठलं. मात्र, हे धनादेश कशाचे याची माहिती घरी कुणालाही सांगता आली नाही.
बजाज कंपनीकडून आलेले धनादेशावर 9 मार्च 2020 तारीख आहे. कोविड 19 मुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात वाहतूक व्यवस्था बंद होती. काही दिवस वैध असणारे धनादेश मुदतीनंतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचले. आता हे धनादेश नेमके आहेत तरी कशाचे? मुदत बाह्य झालेल्या ह्या धनादेशाची रक्कम या शेतकऱ्यांना मिळून नवसाला पावणारे गणपती बाप्पा या शेतकऱ्यांना पावेल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Sheti Jagat | शेती जगत : राज्यातील कानाकोपऱ्यातील शेतीची खबरबात; पावसामुळे शेतीकामाला वेग