वाशिम : वाशिम जिल्ह्यातील एका शिक्षकाला फेसबुकवर ओळख झालेल्या परदेशी मैत्रिणीने गंडा घातला आहे. फंड ट्रान्सफरच्या नावाखाली तब्बल 35 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.


रिसोड तालुक्यामधील करडा या छोट्याश्या गावात राहणाऱ्या निवृत्ती धांडे या शिक्षकाची फेसबुकवर ओळख झालेल्या परदेशी मैत्रिणीने फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षक असलेल्या निवृत्ती धांडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

युनाईट नेशन ऑर्गनाईझेशन सिरीया डिव्हिजनमध्ये सैन्यात कार्यरत असलेल्या सर्जट मेसी डोनाल्ड या अमेरिकन व्यक्तीसोबत फेसबुकद्वारे त्यांची फेब्रुवारी 2015 मध्ये मैत्री झाली. त्यानंतर काही कालावधी उलटल्यानंतर स्वतःच्या मालकीचा असलेला 5.6 मिलियन अमेरिकन डॉलर फंड भारतात गुंतवण्याची इच्छा तिने व्यक्त केली. त्यासाठी तुम्ही भारतातील हक्कदार म्हणून त्यांना सांगण्यात आलं आणि या शिक्षकाने तिला होकार दिला.

त्यानंतर ईमेलद्वारे संपूर्ण माहिती धांडे यांनी मैत्रिणीला दिली, त्यानंतर मेसी डोनाल्डने सैन्यातील ओळखपत्र आणि फोटो पाठवले. 23 फेब्रुवारीला रेड क्रॉस सिक्युरिटी एजन्सी इराक मार्फत फंड दिल्लीला पाठवला असून हा फंड रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडच्या दिल्ली शाखेत पाठवल्याचे सांगण्यात आलं.

याबाबतची सूचना आरबीएसचे ट्रान्स्फर विभागप्रमुख प्रमोद गीलासर आणि मार्क डेव्हिड हे फोनवरुन धांडेंना देत होते. त्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी फोनवरुन 70 हजार रुपये एका खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आलं. बँकेकडून पूजा शर्मा नामक महिला करन्सी चेंज आणि इतर सोपस्कार पूर्ण करण्यासाठी फोनद्वारे सूचना देत होती.

त्यानुसार आरबीएस बँकेकडून मिळालेल्या विविध खात्यात रक्कम टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार आतापर्यंत या शिक्षकाने 35 लाखांची रक्कम त्यांनी हडप केल्याची खात्री पटल्याने सर्जट मेसी डोनाल्ड या अमेरिकन व्यक्तीविरुद्ध या शिक्षकांनी रिसोड पोलिसात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी रिसोड पोलिसांनी हे प्रकरण सायबर सेल कडे दिल्याने अधिक माहिती देण्यास नकार दिला. तर तक्रारदार शिक्षकही समोर येण्यास तयार नाही.