वर्धा : ज्या जिल्ह्यात दारुबंदी आहे, त्याच जिल्ह्यात दारुचा मोठा साठा सापडला आहे. त्याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे, हा दारुसाठा शासकीय विश्रामगृहातून जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे दारुबंदी असलेल्या जिल्ह्यातील जळजळीत वास्तवच समोर आले आहे.


वर्धा जिल्ह्यात जरी दारुबंदी असली, तरी मोठ्या प्रमाणात दारु विक्री होणारा जिल्हा म्हणूनच वर्ध्याची ओळख बनली आहे. रोज होणाऱ्या दारुच्या कारवाईच्या आकडेवारीतून हे आणखी ठळकपणे दिसून येतं. मात्र काल पोलिसांनी जिथून दारुसाठा जप्त केला, ती कारवाई इतरांपेक्षा वेगळी ठरते. कारण सर्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहतील मागच्या बाजूला असणाऱ्या खोलीतून मोठा दारुसाठा जप्त करण्यात आला.

वर्ध्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने दारुसाठा जप्त करण्याची कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितेच्या आधारे ही कारवाई केली. यात हिरासिंग बावरी याने ठेवलेल्या देशी दारुच्या 384 बॉटल असा साठा जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी दारुसाठा जप्त करत कारवाई केली खरी, मात्र इथे दारु लपून ठेवताना हे कोणाचा लक्षात कसं आलं नाही, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.