हवामान खात्यावर गुन्हे नोंदवा, अंदाज चुकल्याने शेतकरी आक्रमक
एबीपी माझा वेब टीम | 21 Jun 2017 06:19 PM (IST)
वर्धा : पावसाचे चुकीचे अंदाज वर्तवणाऱ्या हवामान खात्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी वर्ध्याच्या शेतकऱ्यांनी केली आहे. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवूनही पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांचा पारा चढला आहे. हवामान खात्याचे अंदाज पाहून आम्ही सुरुवातीला सोयाबीनची पेरणी केली, मात्र त्यानंतर पावसानं सलग तीन आठवडे तोंड दाखवलं नाही. परिणामी अख्खं पीक जळून गेलं. त्यामुळे आता आम्हाला दुबार पेरणी करावी लागत असल्याचं सांगत शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. गेल्या अनेक वर्षात हवामान खात्याचे अंदाज आणि पाऊस यांचा ताळमेळ लागत नाही, त्यामुळे खोटे अंदाज वर्तवून शेतकऱ्याचं नुकसान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.