Maharashtra Politics: कोपरगावमधील भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी काल शरद पवार यांच्या सोबत एकाच गाडीतून प्रवास केल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार महायुतीत आल्याने कोपरगाव मतदारसंघात कोल्हे कुटुंबीयांची राजकीय अडचण झाली आहे. विवेक कोल्हे यांनी शरद पवारांसोबत प्रवास केल्याने कोल्हे तुतारी हाती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतरच पुढील राजकीय निर्णय घेऊ,आज भाजपातच आहे अशी सूचक प्रतिक्रिया शरद पवार यांच्या भेटीनंतर विवेक कोल्हे यांनी दिली आहे.
शरद पवारांसोबत एकाच गाडीत केला प्रवास
भाजप नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी आज शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. विवेक कोल्हे आणि शरद पवार यांनी आज एकाच गाडीतून प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. कोपरगावचे विवेक कोल्हे आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकत्र प्रवास केला. शरद पवार यांनी विवेक कोल्हे यांना स्वतःच्या गाडीत बसण्याची सूचना केली. त्यानंतर विवेक कोल्हे हे पवारांच्या गाडीतून रवाना झाले. कोल्हे सध्या भाजपमध्ये आहेत मात्र, भाजपमध्ये ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहेत.
राज्यात महायुती सरकारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काही जागांवर तेढ निर्माण झाली आहे, त्याचप्रमाणे कोपरगावमध्येही मतदारसंघावरून आणि जागेवरून धुसफूस पाहायला मिळत आहे. विद्यमान आमदार आशुतोष काळे (Ashotosh Kale) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) काही दिवसांपूर्वीच आशुतोष काळे यांनी उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे भाजप नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe) कोडींत सापडले आहेत. आता विवेक कोल्हे राष्ट्रवादी शरद पवार गटात (NCP Sharad Pawar Group) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याच दरम्यान आज शरद पवार आणि विवेक कोल्हे यांनी आज एकाच गाडीतून प्रवास केला. या प्रवासावेळी त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली असावी याबाबत उत्सुकता नेत्यांना लागली आहे.
विवेक कोल्हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक
विवेक कोल्हे हे सहकारातील दिग्गज नेते शंकरराव कोल्हे यांचे नातू आहे. तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आहेत. काही दिवसांपूर्वी विवेक कोल्हे यांनी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात (Nashik Teachers Constituency Election) नशिब अजमावण्याचा प्रयत्न केला होता. या निवडणुकीत त्यांनी किशोर दराडे त्यांना तगडे आव्हान दिले होते. आता विवेक कोल्हे हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.