विठ्ठल मंदिराच्या सभामंडपातून पुरातन पेंटिंग गायब झाल्यानं नवा वाद, मंदिर समितीनं केला खुलासा
विठ्ठल मंदिरात असणाऱ्या रुक्मिणी सभामंडपात लावण्यात आलेल्या पुरातन जिवंत पेंटिंग सध्या गायब झाल्याने नवीन वाद समोर आला आहे.
Vitthal Temple Rukmini Pandharpur : विठ्ठल मंदिरात असणाऱ्या रुक्मिणी सभामंडपात लावण्यात आलेल्या पुरातन जिवंत पेंटिंग सध्या गायब झाल्याने नवीन वाद समोर आला आहे. केवळ दुरुस्तीसाठी ही चित्रे काढून ठेवल्याचा खुलासा मंदिर समितीने केला आहे. अतिशय पुरातन असणाऱ्या विठ्ठल मंदिरात पूर्वी उत्पाद समाजाने रुक्मिणी सभामंडपामध्ये रुक्मिणी स्वयंवराची काही जिवंत चित्रे तयार करून घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून सभामंडपातून ही चित्रे गायब झाली असून त्या जागी त्याची डिजिटल पोस्टर लावण्यात आल्याने सध्या नवीन वाद उद्भवला आहे.
रुक्मिणी स्वयंवराच्या कथेमध्ये असणाऱ्या विविध दृश्यांची जिवंत चित्रे साधारण 1970 च्या दरम्यान प्रसिद्ध चित्रकार कल्याण शेटे यांनी ही चित्रे काढण्यास सुरुवात केली होती. 1970 ते 1985 कालावधीमध्ये त्यांनी नऊ जिवंत चित्रे रेखाटण्याचे काम पूर्ण केले होते. या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे ही चित्रे काढताना त्या पद्धतीची मॉडेल त्यांनी दागिन्याच्या स्वरूपात समोर बसून त्यातून प्रत्येक चित्र रेखाटली होत . यासाठी परिसरातील स्त्री आणि पुरुषांना व्यक्तिरेखेनुसार दागिने आणि तशाच पद्धतीची वेशभूषा परिधान करून मॉडेल म्हणून समोर बसविले होते. रुक्मिणी स्वयंवर कथेतील अध्यायानुसार जवळपास 18 चित्र काढायचे काम कल्याण शेटे हे करीत होते. भागवताचार्य स्वर्गीय वा ना महाराज उत्पात आणि इतर उत्पात मंडळींनी हे काम ख्यातनाम चित्रकार कल्याण शेटे यांना दिले होते. मात्र दुर्दैवाने नऊ चित्रे पूर्ण झाल्यानंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर पराग सोमण यांनी पुढील चार चित्रे काढल्याची माहिती ऋषिकेश उत्पात यांनी दिली.
अचानक काही दिवसांपासून मंदिरातील ही चित्रे गायब झाल्याने नवीन वाद
विठ्ठल मंदिरातील ही चित्रे वर्षानुवर्षे येणारे भाविकांनी कलाकारांसाठी एक पर्वणी ठरत होती. मात्र अचानक काही दिवसांपासून मंदिरातील ही चित्रे गायब झाल्याने नवीन वाद समोर आला आहे. यातच बडवे उत्पात यांच्या ताब्यात मंदिर असताना जागतिक दर्जाचे चित्रकार स्वर्गीय रवी वर्मा यांनी विठ्ठलाचे मोहिनी रूपात रेखाटलेले एक अनमोल चित्रही गेल्या काही वर्षापासून गायब झाल्याची खंत ऋषिकेश उत्पात यांनी बोलून दाखवली आहे.
मंदिर समितीकडून सर्व चित्रांचा ठेवा सुरक्षित
दरम्यान उत्पात समाजाने करुन घेतलेल्या या अनमोल चित्रांचा खजिना जर मंदिर समितीला ठेवायचा नसेल तर तो परत उत्पात समाजाकडे दिल्यास ही अनमोल चित्रे समाजाच्या उपासना मंदिरात आम्ही लावू अशी भूमिका महेशचार्य उत्पात यांनी केली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी आवाज उठवत मंदिर समितीला याचा जाब विचारत आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. यानंतर मंदिर समितीकडून हा सर्व चित्रांचा ठेवा सुरक्षित ठेवला असून सध्या मंदिराचे जतन व संवर्धन हे काम सुरू असल्याने चित्र खराब होऊ नये म्हणून काढून ठेवल्याचे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले आहे.
दरम्यान रुक्मिणी सभा मंडपात ओरिजनल चित्रे काढून त्या ठिकाणी डिजिटल चित्रे लावल्याने या वादाला सुरुवात झाली होती. यातच आता स्वर्गीय राजा रविवर्मा यांच्या चित्राबाबतही सवाल उपस्थित झाल्याने मंदिर प्रशासनाला आता हा सर्व अनमोल ठेवा पुन्हा भाविकांसमोर व्यवस्थित आणावा लागणार आहे.
























