मुंबई : एखाद्या मराठी सिनेमाची कथा वाटावी, असा अनुभव 2010 पासून गिरगावातील वैद्यवाडीतील रहिवाशी अनुभवत आहेत. बिल्डर आणि स्थानिक रहिवाशांच्या वादात चक्क विठ्ठल-रुक्मिणीचं मंदिरच बंदिस्त झालं आहे.


देव भक्तांविना पोरका झाला, असं काहीसं इथे चित्र पाहायला मिळतं आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा साक्षीदार असलेलं हे मंदिर सध्या पारतंत्र्य उपभोगतो आहे.

गिरगावातील वैद्यवाडीत आधी बैठ्या चाळी होत्या. त्या चाळी विकसित करण्याचे काम कोठारी बिल्डरने हाती घेतलं. स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन त्यांनी बांधकामाला सुरुवात केली. एकूण 87 कुटुंबांची वस्ती असलेली ही जागा कोठारी ब्लिडरने 21 मजल्याची टोलेजंग इमारत बांधून विकसित केली. पण जेव्हा मंदिर हटवण्याचा प्रश्न आला, तेव्हा काही स्थानिकांनी याला विरोध सुरु केला. अर्थात स्थानिकांच्या प्रामाणिक भावना त्या मंदिराशी जोडल्या गेल्या आहेत. पण बिल्डरने ही जागा आता आपली असल्याचे सांगत मंदिराला टाळा मारलाचा आरोप स्थानिक लोक केला आहे. अखेर विठू-रखुमाईच्या मंदिराच्या जागेच्या प्रश्नाने आता कोर्टाची पायरी चढली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

या सर्व प्रकरणासंबंधित एबीपी माझाने बिल्डरशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचं सांगत कॅमेरासमोर येण्याचं टाळलं आणि या प्रकरणात कोर्ट जो निर्णय देईल याचं आम्ही स्वागत करु अशी प्रतिक्रिया दिली.

मराठमोळ्या गिरगावला जसा इतिहास आहे, तसाच इतिहास या विठ्ठल-रखुमाई मंदिरालाही आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्याची चळवळ सुरु असताना चाफेकर बंधूंच्या बैठका या मंदिरात होत असत. या साऱ्या ऐतिहासिक, भावनिक आठवणी सांगताना इथले रहिवाशांचे डोळे अक्षरश: गहिवरुनही येतात. इथल्या रहिवाशांच्या डोळ्यांमध्ये विठ्ठल-रखुमाईप्रती आपल्या भावना, प्रेम आणि प्रामाणिक निष्ठाही दिसून येते. मंदिरासमोरुन जाणारा एकही रहिवाशी मंदिराच्या पायरीला हात लावल्याशिवाय पुढे जात नाही. पण या भावना त्या बिल्डरला दिसत नाहीत, ही अडचण आहे.

आता कोठारी बिल्डरने मंदिराला कुलुप लावल्याने आणि मनमानी निर्णय घेतल्याने इथल्या रहिवाशांचे डोळे पाणावलेले दिसता. आपल्या विठोबाला भेटता येत नाही, याची खंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तीव्रपणे जाणवते.

इमारतीचा प्रकल्प जेव्हा सुरु झाला, त्यावेळी बिल्डर आणि स्थानिक रहिवाशांमध्ये मंदिर दुसऱ्या जागी हलवण्याबाबत करार झाला. त्याप्रमाणे बिल्डरने दुसरं मंदिर बांधलही. पण आपलं देवस्थानच हलणार असल्याचं लक्षात येताच, पुन्हा काहींनी यासंदर्भात विरोध केला आणि आता हे प्रकरण कोर्टात जाऊन पोहोचलं आहे.

आता कोर्टात विठू-रखुमाईवर अपार प्रेम करणारे हे रहिवाशी जिंकतात की बिल्डर, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.