पुणे: मला विरोध करणाऱ्या संघटनांचा बोलविता धनी सरकारमधलाच असल्याचा आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे. 'मुख्यमंत्री हा भला माणूस आहे पण सरकारमधले काही लोक मराठा समाजात फूट पाडण्याचं काम करत असल्याचंही विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.


काल मुख्यमंत्र्यांसोबत मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत विनायक मेटे यांना शिवस्मारक समितीतून वगळण्याची मागणी करण्यात आली. त्यासंदर्भात आज विनायक मेटे यांनी सरकारमधल्याच काही लोकांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या संघटनेच्या प्रतिनिधींनीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची काल भेट घेतली होती. या बैठकीत मराठा समाजाच्या संघटनांनी शिवस्मारक समितीचं पुनर्गठन करण्याची मागणी केली. शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यावर मराठा समाजाने आक्षेप घेतला. टीम झाली पण त्यांनी काम केलं नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मराठा संघटनांना यात सामील करुन घेतलं नसल्याचं सांगतानाच मेटेंची कार्यपद्धत मान्य नसल्याचंही मराठा समाजाच्या संघटनांच्या प्रतिनिधींतर्फे सांगण्यात आलं होतं.

एकूण 43 मराठा समाजाच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी या बैठकीला हजेरी लावली होती. छावा संघटना, मराठा आरक्षण समन्वय समिती, ताराराणी ब्रिगेड प्रदेश, शंभूराजे युवा क्रांती संघटना, शेतकरी मराठा सेवा संघ यासारख्या संघटनांचा समावेश होता.

संबंधित बातम्या:

शिवस्मारक समितीवरुन मेटेंना हटवा, 43 मराठा संघटना आक्रमक