Vijayrao Deshmukh passes away : धर्मभास्कर प. पू. सद्गुरूदास महाराज उपाख्य शिवकथाकार विजयराव देशमुख यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर विवेक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच भक्तगण आणि अनुयायांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.  

Continues below advertisement

राष्ट्रभक्त पिढी निर्माण करण्याचे काम त्यांच्या हातून घडले : मुख्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र तळागाळात गेले पाहिजे, यासाठी संपूर्ण आयुष्य त्यांनी व्यतित केले. सोपी, रसाळ आणि लोकांना खिळवून ठेवणारी भाषा हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यातून अनेक तरुणांना आयुष्याची दिशा मिळाली. राष्ट्रभक्त पिढी निर्माण करण्याचे काम त्यांच्या हातून घडले. छत्रपती सेवा प्रतिष्ठान आणि गुरुमंदिर परिवार हा त्यांचा मोठा परिवार होता. अनेक ग्रंथांची, काही नाटकांची निर्मितीही त्यांनी केली. संत साहित्याचाही त्यांचा अतिशय गाढा अभ्यास होता. रामायण, महाभारत, दासबोध, ज्ञानेश्वरी, श्री गुरुचरित्र यावर त्यांचे प्रभुत्त्व होते. अनेक शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमही त्यांनी राबविले.मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या चाहत्यांच्या विशाल परिवाराच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयांना आदरांजली अर्पण केली. 

समाजप्रबोधकांमध्ये त्यांचे एक अग्रगण्य स्थान  : मोहन भागवत 

श्री सद्गुरुदासजी महाराजांच्या अचानक जाण्याचा धक्का हा अतिशय पीडादायक आणि मनामध्ये काळजी उत्पन्न करणारा आहे. विदर्भ-महाराष्ट्रामध्ये शिवकथाकार म्हणून आणि नंतर आध्यात्मिक साधना झाल्यावर सद्गुरूदास महाराज म्हणून समाजामध्ये न्याय, निती, धार्मिकता आणि राष्ट्रभक्ती जागरुक ठेवण्यासाठी प्रबोधनाचे काम करणाऱ्यांमध्ये त्यांचे नाव अग्रगण्य आहे. आपल्या प्रसन्न आणि सरळ स्वभावाने प्रत्येक गोष्टीची बुद्धीनिष्ठ, तर्कनिष्ठ चिकित्सा आणि त्याची सूक्ष्म अनुभूती, याच्या आधारावर त्यांनी पुष्कळ लोकांना या कठीण काळातसुद्धा सन्मार्गी लागण्याची दीक्षा दिली. समाजप्रबोधकांमध्ये त्यांचे एक अग्रगण्य स्थान होते आणि त्यामुळे चांगलेपणा समाजात जागा रहावा आणि वाढावा यासाठी काम करणाऱ्यांना एक चांगला सक्षम आधार असे ते होते. आज त्यांच्या अचानक जाण्याने ही रिक्तता उत्पन्न झालेली आहे. त्यांचे प्रतीतीवान आणि विद्यावान अशा प्रकारच्या सानिध्याला आम्ही मुकलो आहोत. त्यांच्या तपस्येमुळे ईश्वरचरणी त्यांची गती रुजू झालेलीच आहे. परंतु त्यांच्या या वियोगातूनही धैर्य कायम राखून त्यांचे कार्य सतत पुढे चालावे अशा प्रकारची शक्ती आणि धैर्य भगवंताने आपण सर्वांना द्यावे अशी मी प्रार्थना करतो आणि त्यांच्या पवित्र स्मृतीला माझी वैयक्तिक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो अशा शब्दात सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी आदरांजली अर्पण केली आहे. 

Continues below advertisement