जालना : राज्यात एकीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवरुन राजकारण तापलं असताना दुसरीकडे विधानसभा निवडणुकांचे वेधही सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. त्यासाठी, रणनिती आखायला आणि विधानसभा मतदारसंघांची चाचपणी करायला देखील सुरुवात झाली आहे. अनेक पक्षांच्या नेत्यांचे राजकीय दौरे व गाठीभेटीही पाहायला मिळतात. त्यातच, लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मोठा फटका महायुतीला बसला असून महाविकास आघाडीला फायदा झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे, जरांगे यांच्या भेटीसाठी नेतेमंडळींची रांग लागल्याचं दिसून येतं. आता, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, यावरुन तर्क वितर्क सुरू आहेत. 


मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी विधानसभा (Vidhansabha) निवडणुकांसाठी रणनिती आखायला सुरुवात केली असून विधानसभेत उमेदवारच उभा करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे 29 ऑगस्ट रोजी ते यासंदर्भातील निर्णयही जाहीर करणार होते, मात्र विधानसभा निवडणुका लढवण्यासंदर्भातील घोषणेची तारीख पुढे ढकलली आहे. त्यामुळे, जरांगे खरंच निवडणूक लढवणार आहेत की, गत निवडणुकांप्रमाणे कोणाला तरी पाडा म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यातच, आज पृथ्वीराज चव्हाण यांनी अंतरावाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत मराठा आरक्षण व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती आहे. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत, तसेच मराठा आरक्षणासंदर्भाने त्यांनीही त्यांच्या कार्यकाळात काम केल्यामुळे या भेटीत आरक्षणावरच चर्चा झाल्याचे समजते. मात्र, निवडणुकांपूर्वी किंवा मनोज जरांगे यांच्या निवडणूक लढवण्याच्या घोषणेपूर्वी चव्हाण यांनी जरांगेंची भेट घेतल्याने राजकीय उलथापालथ तर होणार नाही ना, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. 


जरागेंनी 29 ऑगस्टची बैठक पुढे ढकलली


निवडणुकांबाबत आपली रणनीती सुरू असून 29 ऑगस्टला आपण काय भूमिका घेतो हे सरकारला पाहायचे आहे. त्यांनी निवडणुका लांबवल्यामुळे आपल्याला 29 ऑगस्टची बैठक पुढे ढकलावी लागेल. यावेळेस जे होईल ते होईल,आपली रणनीती डाव प्रतिडाव कळू नयेत. निवडणुकीची घोषणा होण्याअगोदर आपण बैठक ठरवू. आपले डाव सरकारला का कळू द्यायचे? सर्वांना मराठा समाजाला सांगायचे, त्यांची निवडणूक तारीख जाहीर होईल तेव्हा बैठक घेऊ, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. 



फडणवीसांनी राजीनामा द्यावा - चव्हाण


छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरुन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय. राज्यात कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी असल्याचं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. राज्यात सध्या विविध भागात गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. या घटनावरुन विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका करताना दिसत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत विरोधक सरकारवर प्रहार करत आहेत. शातच आता पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.