Rohit Pawar on Police: महाराष्ट्रात राजरोस गुंडगिरीचा हैदोस सुरू असतानाच काल विधानभवनामध्ये कार्यकर्त्यांच्या हाणामारीने टोक गाठले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण केली. लोकनियुक्त प्रतिनिधींमध्ये शिवराळ भाषा होत असेल आणि त्याचे पर्यवसान जर हाणामारीत होत असेल तर मग महाराष्ट्र नेमका गेला कुठं अशी विचारणा करण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. दरम्यान, या राड्यानंतर रात्रभर पोलिसांच्या कारवाईमुळेही चांगलीच चर्चा झाली. आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना अटक केल्याची माहिती समजताच जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या गाडीखालीच ठिय्या मांडत एक तास गाडी रोखून धरली. यावेळी पोलिसांच्या गाडीची समोरून मोडतोड झाल्याचे सुद्धा दिसून आले. दरम्यान, नितीन देशमुख यांना कोणत्या पोलीस ठाण्यामध्ये नेलं आहे या संदर्भातील माहिती मिळत नसल्याने जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांच्याकडून शोध मोहीम सुरू होती. मात्र शोध लागत नसल्याने रोहित पवार यांचा पोलिसांसमोर संतापाचा पार चढल्याचा दिसून आले. त्यामुळे पोलिसांना रोहित पवार यांनी केलेली दमदाजी कॅमेरामध्ये कैद झाली आहे. रोहित पवार हे पीएसआयशी वाद घालताना दिसून येत आहेत.
आवाज खाली, आवाज खाली
आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार हे समर्थकांसह पोहोचले. यावेळी पोलिसांकडून योग्य पद्धतीने उत्तरे न दिल्याने रोहित पवार हे पीएसआयवर चिडल्याचे दिसून आले. यावेळी वरिष्ठ पोलिसांनी हस्तक्षेप करून दोघांमधील वाद थांबवला. मात्र यावेळी रोहित पवार प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसून आले. रोहित पवार पीएसआयला आवाज खाली, आवाज खाली अशा पद्धतीने बोलताना दिसून येत आहेत. बोलता येत नसेल, तर बोलायचं नाही, दमदाटी केल्यास आणखी आवाज चढवण्याची भूमिका रोहित पवार यांनी घेतल्याचे दिसून आले. दरम्यान या दमदाटीचा व्हिडिओ समोर येतात रोहित पवार यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले की, पोलीस ठाण्यामध्ये काय सुरु आहे याची काहीच माहिती नसल्याने नितीन नितीन देशमुख कुठे आहे असे विचारणा पोलिसांकडे करत असताना पोलिस आयुक्तांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात असल्याची असल्याची माहिती सांगितली. यावेळी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो असता पोलिस आमदारांशी नीट बोलत नसतील, तर ते गरिबांशी किती नीट बोलतील? एखाद्या गरीबाला तर कानाखाली मारतील असं रोहित पवार यांनी आपल्या खुलाशामध्ये म्हटलं आहे.
रात्री दोन वाजता अतिरिक्त पोलिस आयुक्तांना कोणाचा फोन येतो
एबीपी माझाशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, तुम्ही कसे वागता? दोन आमदा, एक माजी मंत्री असताना तुम्ही नीट वागत नाही, उद्या त्यांच्यासमोर गरीब येऊन उभा राहिला तर त्याला हाकलून सुद्धा लावतील. पोलिसांकडून चार तास फिरवलं जात होतं तरी सुद्धा माहिती दिली जात नाही. आम्ही नितीनची चौकशी केली आणि पाच मिनिटांमध्ये निघून गेलो. इतकाच काम होतं असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रात्री दोन वाजता अतिरिक्त पोलिस आयुक्तांना कोणाचा फोन येतो हे समजण्यापलीकडे असल्याचं रोहित पवार म्हणाले. फोनवरून फक्त येस सर, येस सर अशा पद्धतीने सुरू होते आणि आम्हाला गंडवत होते असा आरोप रोहित पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना केला.
इतर महत्वाच्या बातम्या