नवी मुंबई : कडाक्याच्या उन्हामुळे भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. भाज्यांचे दर अचानक वाढल्यामुळे गृहिणींचं घरखर्चाचं बजेट कोलमडलं आहे. वाढत्या उन्हाचा उत्पादनावर मोठा परिणाम झाला. शिवाय पाण्याच्या टंचाईमुळे राज्यातील भाजीपाल्याचं उत्पादन घटलं आहे.


नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी भाज्यांच्या किंमती 30 ते 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. एपीएमसीमध्ये दिवसाला 600 ते 650 गाड्या होणारी भाजीपाला आवक सध्या 500 ते 550 गाड्यांवर आली आहे. जर ही आवक अशीच घटली तर भाज्यांच्या दरात आणखी वाढ होणार आहे.

कडक उन्हामुळे पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरी भाजीपाला लागवड करताना दिसत नाही. दुसरीकडे गेल्या 2-3 महिन्यांमध्ये कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वाटाणा यांसारख्या भाज्यांचं उत्पादन आवश्यकतेपेक्षा जास्त झाल्याने बाजारातील दर कोसळले होते. त्यामुळे या भाज्यांकडे कमी भावामुळे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने आता त्यांची आवक घटून दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे.