मुंबई : पेट्रोल, डिझेलच्या दरानं शंभरी पार केल्यानंतर आता भाज्यांचे दरही त्यांच्याशी स्पर्धा करू लागलेत. बाजारात कोथिंबीरीच्या जुडीनंही शतक गाठत डिझेलशी बरोबरी केलीय. कोथिंबीरीला टोमॅटोची स्पर्धा आहे. टोमॅटो सध्या 80 ते 100 रुपये किलोनं विकला जातोय. तर कांद्याचा दरही 60 ते 80 रुपये किलो आहे.


परतीच्या पावसाने भाजीपाल्यावर मोठा परिणाम केला असून नुकसान झाल्याने दर गगनाला भिडले आहेत. नाशिक, नगर , पुणे भागात पडलेल्या पावसाने पाल्याभाज्या तर मातीमोल झाल्या आहेत. शेतात साठलेल्या पावसात भाजीपाला सडल्याने एपीएमसी मध्ये आवक घटली आहे. सद्या फक्त 450 ते 500 गाड्यांची आवक होत असून जवळपास 300 गाड्या आवक कमी झाली आहे. 



 


वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये कोथिंबीरचा 10 ते 15 रूपये जुडी असणारा भाव थेट 60 रूपयांच्या वर गेला आहे. तर हाच दर मुंबईमध्ये चक्क 150 रूपयांच्या घरात पोहचला आहे. पावसात भाजीपाला खराब झाल्याने मुंबईतील किरकोळ व्यापाऱ्यांना अर्धा माल फेकून द्यावा लागतो. तसेच पेट्रोल, डिझेल च्या किंमती वाढल्याने वाहतूक महाग झाली आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम झाल्याने दर प्रचंड वाढले आहेत. नविन पीक येईपर्यंत पुढील एक महिना तरी लोकांना महाग भाजीपाला खावा लागणार आहे. 


भाजीपाला दर प्रति किलो 


भाजीपाला              दर


टोमॅटो  -            70-80
फरसबी  -          80-90
वटाणा   -           160-170
गवार    -             120-130
भेंडी     -              75-80
शिमला   -          100-110
दोडका   -           90-100
फ्लाॅवर    -          90-100
कोबी     -             60-70
शेवगा   -            150-160


प्रति जुडी - 


कोथिंबीर - 60-65
मेथी - 40-50
पालक - 30-40