मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केलं. ई-पास, सुशांतसिंह राजपूत, महाविकास आघाडी यावर त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. ई पास बाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नवरा-बायको घरी एकत्र राहू शकतात, मात्र स्कूटरवर एकत्र बसू शकत नाहीत. अनोळखी लोकांसोबत प्रवास करायला मुभा दिलीय तर मग एका कुटुंबाला एकत्र जायला बंदी का? ठाकरे सरकार देखील मोदींच्या पावलावर पाऊल ठेवायला लागलं आहे.

Continues below advertisement

लोकांच्या वैयक्तिक गोष्टींवर निर्बंध आणणं बंद करा. कोविडचं नाटक बंद करून खऱ्या प्रश्नांकडे सरकारने लक्ष द्यावे. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राज्यात सध्या उद्भवलेल्या पूर परिस्थितीकडे गंभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा मोठं संकट राज्यावर येईल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

सुशांतसिंह प्रकरणात ड्रग्ज आणि आत्महत्या याचा संबंध काय?

Continues below advertisement

सुशांत सिंहच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टबद्दल सीबीआयने अजून वेगळं काही म्हटलेलं नाही. जोपर्यंत मृत्यूच्या कारणाबाबत सीबीआय स्पष्टता आणत नाही तोपर्यंत काही म्हणता येणार नाही. ड्रग्ज आणि आत्महत्या याचा संबंध काय? सीबीआयचा रिपोर्ट येईपर्यंत सगळ्यांनी शांत बसले तर बरं होईल. सध्या फक्त अंदाज व्यक्त केला जातोय. ज्याची कल्पनाशक्ती जशी आहे तसा तो त्याला आकार देतोय, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.

महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष चालेल

महाराष्ट्र विकास आघाडी सरकार चालेल की पडेल अशी कायमच चर्चा असते. मात्र महाविकास आघाडी सरकार रडतखडत का होईना हे सरकार पाच वर्षे चालेल असं मला वाटतं. जोपर्यंत सरकारच्या बाहेर पडण्याशिवाय गत्यंतर नाही अशी परिस्थिती येत नाही तोपर्यंत हे सरकार पडणार नाही. सत्ता कोणीही सोडत नसतं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.