Lok Sabha 2024: पुण्यातील वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे (Pune Lok Sabha Constituency) उमेदवार वसंत मोरे (Vasant Mor) यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान मिटकरींनी सहकुटुंब वसंत मोरे यांचा स्वागत केलंय आणि काही काळ या दोघांमध्ये राजकीय चर्चा देखील झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान काल रात्री अकोल्यात वसंत मोरे यांचा वंचित मध्ये प्रवेश पार पडला. वंचितकडून पुण्यातील उमेदवारी जाहिर झाल्यानंतर काल वंसत मोरे हे अकोल्यात दाखल झाले होते. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या यशवंत भवन निवासस्थानी वसंत मोरेंनी काल रात्री वंचितमध्ये प्रवेश करीत आता पुण्याचा खासदार वंचितचा असणार, असा विश्वासही त्यांनी बोलताना व्यक्त केला होता.


राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क अन् चर्चांना उधाण


दरम्यान, काल रात्री वंसत मोरे हे अकोल्यात मुक्कामी होते. आज 6 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास त्यांनी अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे आमदार अमोल मिटकरी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. दरम्यान, आमदार अमोल मिटकरी आणि वसंत मोरे यांच्या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चां आणि तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.


अकोल्यात वसंत मोरेंचा वंचितमध्ये पक्षप्रवेश


दरम्यान, नुकतेच मनसेला सोडचिठ्ठी देत अखेरचा जय महाराष्ट्र म्हणणाऱ्या वसंत मोरे यांना वंचितकडून पुण्यातून उमेदवारी जाहीर झाली होती. वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांची देखील भेट घेतली होती. मात्र, काँग्रेसकडून पुण्यात रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर वसंत मोरेंनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. यानंतर वंसत मोरे यांना वंचितच्या तिकीटावर उमेदवारी मिळाली असून 2 एप्रिलला त्यांच्या नावावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झालाय. दरम्यान काल वंचितमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी वसंत मोरे यांनी प्रवेश केला आहे. यावेळी वसंत मोरे आणि त्यांचा मित्रपरिवार देखील उपस्थित होता.


इतर महत्वाच्या बातम्या